सवणा परिसरात अवैध वृक्षतोड जोमात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2017 01:15 AM2017-03-15T01:15:08+5:302017-03-15T01:15:08+5:30
वृक्षतोडीविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी.
सवणा (बुलडाणा), दि. १४- एकीकडे शासन वृक्ष लागवड करण्यासाठी प्रयत्न करीत असून, त्यावर कोट्यवधी रूपये खर्च करत आहे आणि दुसरीकडे मोठमोठय़ा झाडांची खुलेआम तोड चालू आहे. या वाढत्या वृक्षतोडीमुळे कसे होणार वृक्ष संवर्धन, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सवणा येथून दररोज दोन ते तीन ट्रॅक्टर ट्रॉलीमधून अवैधरीत्या लाकडांची तस्करी होताना दिसत आहे. याकडे महसूल विभागाने लक्ष देण्याची मागणी होत आहे. दरवर्षी हजारो झाडे लावायची व तेवढीच तोडायची. त्यामुळे झाडांची संख्या वाढण्याऐवजी ती कमीच होताना दिसत आहे, तरी संबंधित विभागाने त्यावर लक्ष देऊन कडक कारवाई करावी, जेणेकरून वृक्षतोड थांबेल, अशी मागणी ग्रामस्थांनी वन विभागाकडे शनिवारी केली.