पेनटाकळी प्रकल्पातून पाण्याचा अवैध उपसा
By admin | Published: February 4, 2016 01:40 AM2016-02-04T01:40:52+5:302016-02-04T01:40:52+5:30
पोलिसांची कारवाई; चार जणांवर गुन्हा दाखल.
साखरखेडा(जि. बुलडाणा): पेनटाकळी जलाशयातील पाण्याचा अवैध उपसा थांबविण्यासाठी गेलेल्या पाटबंधारे विभागाच्या कर्मचार्याला शिवीगाळ व मारण्याची धमकी देणार्या चार जणांविरुद्ध साखरखेर्डा पोलिसांनी बुधवारी गुन्हा दाखल केला. पेनटाकळी जलाशयामधून मोठय़ा प्रमाणावर अवैध पाणी उपसा होत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी विजय झाडे यांना मिळाली होती. हा अवैध उपसा थांबविण्याचे आदेश पाटबंधारे विभागाला जिल्हाधिकार्यांनी दिले. त्यानुसार संबंधित विभागाचे कर्मचारी प्रकाश भिकाजी गाडेकर हे सहकार्यांसह २ फेब्रुवारी रोजी दुपारी पेनटाकळी जलाशयावर गेले असता, तेथे १५0 लोकांचा जमाव जमला होता. त्यापैकी मधुकर धोंडगे, किसन इंगळे, संतोष डुकरे आणि सुरेश ढोणे या चौघांनी प्रकाश गाडेकर व त्यांच्या सहकार्यांना शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली. एवढय़ावरच हे चौधे थांबले नाही, तर त्यांनी प्रकाश गाडेकर यांना पुन्हा येथे आल्यास हातपाय तोडण्याची धमकी दिली. याप्रकरणी प्रकाश गाडेकर यांनी बुधवारी साखरखेर्डा पोलिसांत तक्रार दिली. त्यावरून मधुकर धोंडगे, किसन इंगळे, संतोष डुकरे व सुरेश ढोणे या चार जणांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणण्याच्या कारणावरून भादंविच्या कलम ३२३, ३५३, ५0४, ५0६ अन्वये पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.