आरोग्य विभागाच्या परिपत्रकाची बुलडाण्यात 'आयएमए'कडून होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 01:28 PM2020-09-12T13:28:34+5:302020-09-12T13:28:57+5:30
११ सप्टेंबर रोजी करण्यात आलेल्या या आंदोलनादरम्यान शासन व आरोग्य विभागाच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : आरोग्य विभागाने ३१ आॅगस्ट रोजी काढलेल्या परिपत्रकाचा निषेध करत इंडियन मेडीकल कौन्सीलच्या बुलडाणा शाखेच्या वतीने जयस्तंभ चौकात नोंदणी पत्राची प्रतिकात्मक होळी केली. ११ सप्टेंबर रोजी करण्यात आलेल्या या आंदोलनादरम्यान शासन व आरोग्य विभागाच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली.
राज्य सरकारेच धोरण हे डॉक्टरांच्या विरोधात असून वेगवेगळे कायदे डॉक्टरांवर लादण्यात येत आहे. दरम्यान, ३१ आॅगस्ट रोजीच्या परिपत्रकानुसार लागू करण्यात आलेले दर रद्द करावे व जुनेच दर कायम ठेवावे, कोरोना संकटात मृत्यू पावलेल्या डॉक्टरांच्या कुटुंबियांना सन्मानपत्र द्यावे तसेच ५० लाखांचा मान्य केलेल्या विम्याचा लाभ द्यावा, अशी मागणी आयएमचे डॉ. जे. बी. राजपूत यांनी केली. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या या परिपत्रकाच्या सुचनांनुसार रुग्णालय चालविणे अवघड आहे. चार सप्टेंबर रोजीच्या आयएमएच्या बैठकीत अनुषंगीक परिपत्रक पुर्णपणे फेटाळण्यात आले असल्याची माहितीही राजपूत यांनी दिली.
त्यानुषंगाने ११ सप्टेंबर रोजी बुलडाण्यात हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील डॉक्टर सहभागी झाले होते. सोबतच यावेळी आयएमचे केंद्रीय सदस्य जे. बी. राजपूत यांच्या नेतृत्त्वात डॉक्टरांनी मेडीकल कॉन्सीलच्या नोंदणी पत्राचीही प्रतिकात्मक होळी केली. दरम्यान पुढील काळातही डॉक्टर आक्रमक आंदोलन करणार आहेत.