राज्यातील रेमडेसिविरचा तुटवडा तात्काळ दूर करा : तुपकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:34 AM2021-04-10T04:34:05+5:302021-04-10T04:34:05+5:30
चिखली : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाबाधितांवर उपचारासाठी प्रभावी असलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनचा मात्र राज्यभरात तुटवडा निर्माण झाला ...
चिखली : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाबाधितांवर उपचारासाठी प्रभावी असलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनचा मात्र राज्यभरात तुटवडा निर्माण झाला आहे. रूग्णांना दोन- दोन दिवस इंजेक्शनची वाट पाहणी लागत आहे. रेमडेसिविरचा तुटवडा तात्काळ दूर करून रूग्णांना दिलासा द्यावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्याकडे केली आहे.
बुलडाणा जिल्ह्यासह राज्यात निर्माण झालेल्या रेमडेसिविर इंजेक्शनच्या कृत्रिम तुटवड्याने रूग्ण आणि नातलगांचे प्रचंड हाल होत असल्याचे पाहता डॉ. शिंगणे यांना तातडीने निवेदन पाठवून रेमडेसिविरचा तुटवडा दूर करण्याची आग्रही मागणी केली. या इंजेक्शनसाठी काही ठिकाणी रूग्णांना दोन-दोन दिवस तर काहींना तीन दिवस प्रतिक्षा करूनही इंजेक्शन मिळत नसल्याचे दुर्देवी चित्र आहे. वेळेवर इंजेक्शन न मिळाल्यास रूग्ण अधिक गंभीर होण्याची भिती आहे. काही औषध विक्रेत्यांनी कृत्रिम टंचाई निर्माण करून बिकट परिस्थितीचा गैरफायदा घेत चढ्या दराने इंजेक्शन विक्रीचा गाेरखधंदा सुरू केला आहे. रुग्णांना तीन हजारांपासून ते दहा ते पंधरा हजारापर्यंत रक्कम मोजून इंजेक्शन घ्यावे लागत आहेत. हा खर्च रूग्णांना परवडणारा नाही. त्यामुळे ठरावित किंमतीमध्येच इंजेक्शन मिळावे आणि चढ्या दराने विक्री करणााऱ्यांवर कठोर कारवाई करावी व तुटवडा दूर करून मुबलक साठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी रविकांत तुपकर यांनी केली आहे. यानुषंगाने त्यांनी डॉ. शिंगणे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून देखील चर्चा केली असता दोन दिवसांत रेमडेसिविर उपलब्ध करून देण्याची ग्वाही डॉ. शिंगणे यांनी दिली आहे.
ऑक्सिजनचाही साठा हवा !
रेमडेसिविर इंजेक्शन सोबतच ऑक्सिजनचाही तुटवडा निर्माण झाला आहे. खासगी रूगणालयांना ऑक्सिजनचा पुरवठा अत्यंत कमी होत असल्याने तेथील रूग्णांच हाल होत आहे. याबाबतही तातडीने कारवाई करून ऑक्सिजनच्या पुरवठ्याबाबतही संबंधिताना निर्देश देण्याची मागणी तुपकरांनी डॉ. शिंगणे यांच्याकडे केली आहे.
..............................