इंधन दरवाढीचा फटका; नांगरणी ८०० रुपये प्रतितास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 11:30 AM2021-05-13T11:30:39+5:302021-05-13T11:30:45+5:30
Agriculture News : ट्रॅक्टर भाडे प्रतितास ८०० रुपये घेतले जात असून, गतवर्षीपेक्षा १०० रुपयांनी वाढ झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : इंधन दरवाढीचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. अवकाळी पावसामुळे शेतजमिनीत थोडा ओलसरपणा आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी नांगरणीची कामे हाती घेतली आहेत. यासाठी लागणारे ट्रॅक्टर भाडे प्रतितास ८०० रुपये घेतले जात असून, गतवर्षीपेक्षा १०० रुपयांनी वाढ झाली आहे.
शेतकरी पाऊस येण्याच्या अगोदर शेतजमिनीची नांगरणी करून ठेवत असतात. नांगरणी केलेली शेतजमीन पिकांसाठी लाभदायक असते. त्यामुळे शेतकरी शेतजमीन नांगरणी करीत असतात. सध्या शेतशिवारात ट्रॅक्टरने नांगरणी करताना दिसून येत आहे. पूर्वी ही कामे बैलजोडीने केली जात असत. अलीकडे शेतकऱ्यांनी बैलजोडी वापरणे बंद केले असून, शेतातील हंगामी स्वरूपात येणारी कामे ट्रॅक्टरने केली जात आहेत. ट्रॅक्टरसुद्धा गावागावात दिसून येत आहेत. त्यामुळे ट्रॅक्टर मालकांना गावात हंगामी स्वरूपात रोजगार उपलब्ध झाला आहे.
सोयाबीन पिकासोबतच कपाशी पिकाची लागवडसुद्धा शेतकरी करीत असतात. मृगाचा अपेक्षित पाऊस झाला तर लागवड करणे सोयीचे होत असते. त्यामुळे कपाशी लागवड करणाऱ्या शेतजमिनीत नांगरणी केली जात आहे. दरवर्षी काही शेतकरी जमीन भाड्याने घेऊन शेती करीत होते. मात्र, शेतीची मशागत, पीक लागवड, बी - बियाणे, कापणी, मळणी, खर्च वाढत चालला असल्याने भाड्याने शेती करण्यास शेतकरी कानाडोळा करीत आहेत.
मागील वर्षीपेक्षा डिझेलच्या दरात तब्बल २० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे ट्रॅक्टरच्या दरातही वाढ झाली आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.