नादुरूस्त वजन काट्यांनी वाढवले कुपोषित बालकांचे वजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2020 12:53 PM2020-08-03T12:53:49+5:302020-08-03T12:53:58+5:30
नादुरूस्त वजनकाट्यांनी नोंदवलेल्या बालकांच्या वजनामुळे मोठा घोळ झाला आहे.
- अझहर अली
लोकमत न्यूज नेटवर्क
संग्रामपूर : ग्रामीण बालकांचे वजन करून त्यांच्या शारिरिक वाढीचा अहवाल तयार करण्यासाठी असलेल्या तालुक्याच्या बाल प्रकल्प कार्यालयाकडे असलेल्या १८८ पैकी १५५ वजनकाटे नादुरूस्त आहेत. तर केवळ ३३ वजनकाटे व्यवस्थित काम करत असल्याचा अहवाल आहे. तरीही त्या नादुरूस्त वजनकाट्यांनी नोंदवलेल्या बालकांच्या वजनामुळे मोठा घोळ झाला आहे. काट्यांनी बालकाचे वजन वाढवल्याने या परिसरातील कुपोषित बालकांची संख्या मार्चपेक्षा कमी नोंदवण्यात येत असल्याचा प्रकार घडत आहे. विशेष म्हणजे, याप्रकरणाच्या चौकशीचे आदेश असताना कोरोना विषाणूच्या आड तीही दडपण्याचा प्रकार घडत आहे.
संग्रामपूर तालुक्यातील १८८ अंगणवाडी केंद्रातील बालकांचे जानेवारी २०२० मध्ये सर्वेक्षण करण्यात आले. वजन काटे नादुरुस्त असताना त्या महिन्यात १२ हजार ७० पैकी ११ हजार ५ बालकांचे वजन घेऊन तीव्र कुपोषित ५० बालके व कमी तीव्र स्वरूपातील ३७२ बालके कुपोषित असल्याचा अहवाल आहे. फेब्रुवारीमध्ये तालुक्यातील ११ हजार ९९२ बालकांपैकी १० हजार ९२७ बालकांचे वजन नोंदवून त्याआधारे तीव्र कुपोषितांची संख्या ३३ तर मध्यम तीव्र कुपोषित बालकांची संख्या २७० एवढी दाखवण्यात आली. जानेवारीपेक्षा फेब्रुवारीमध्ये कुपोषण कमी असल्याचे नमूद आहे. मार्चमध्ये अंगणवाडीच्या ११ हजार ९९२ बालकांपैकी १० हजार ८७९ बालकांचे वजन घेण्यात आले. त्यात चमत्कार व्हावा असे केवळ १० बालके तीव्र कुपोषित आढळून आले. तर मध्यम तीव्र कुपोषित बालके २४५ एवढे आहेत. या तीन महिन्याच्या सर्वेक्षणाची तुलना करता कुपोषण झपाट्याने कमी होत असल्याचे दर्शवण्यात येत आहे. शासकीय यंत्रणा सक्रिय काम करीत असल्याचे भासवत आकडेवारीचा खेळ केला जात आहे.
प्रत्यक्ष नादुरुस्त काट्यांच्या प्रतापामुळे हे कुपोषण कमी झाल्याचे आढळून आले आहे.
सातपुडा पायथ्याच्या पट्ट्यात तब्बल १ हजार ७२ बालके कुपोषित असतांना सॅम मॅम मध्ये केवळ २५५ बालके कुपोषित असल्याचे दाखविण्यात आल्याने प्रशासनाची हातचलाखी स्पष्ट उघड झाली. उन्हाळ्यात कुपोषणाची तीव्रता वाढत असताना यंत्रणेने कुपोषण कमी होत असल्याचे कागदी घोडे नाचवून शासन व गोरगरिब आदीवासींच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रकार सुरू केला आहे.
सरासरी उपस्थितीचे गौडबंगाल
तालुक्यात वर्षभरात ४७ अर्भक व बालमृत्यूची नोंद आहे. अंगणवाडी केंद्रात ११ हजार ९९२ बालके असताना लॉकडाऊन दरम्यान ५० दिवसाचा पोषण आहार केवळ ५ हजार ४४२ बालकांना देण्यात आला. सरासरी उपस्थितीच्या गौडबंगालची लॉकडाऊनमुळे पोलखोल झाली. सरासरी उपस्थिती ५ हजार ४४२ एवढी असतांना ११ हजार ९९२ बालकांची नोंद तपासण्याची गरज आहे.
लॉकडाऊनमध्ये अडकली चौकशी
या संदर्भात तीन महिन्यांपूर्वी लोकमत'ने वृत्त प्रसिद्ध करून या गंभीर प्रकाराला वाचा फोडली. याप्रकरणी उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर यांनी गटविकास अधिकारी बी. डब्ल्यू. चव्हाण, प्रकल्प अधिकारी टी.व्ही. बोरकर यांना कुपोषणासंदर्भात ११ मे रोजी तहसील कार्यालयात हजर राहण्याचे निर्देश दिले. दरम्यान, कोरोना विषाणू संसर्ग झाल्याने चौकशी पूढे ढकलण्यात आली. ती अद्यापही झाली नाही. त्यामुळे कोरोनाच्या आड आदिवासी भागातील कुपोषण दडवले जाण्याचा प्रकार सुरू असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.
कोरोनाचा प्रभाव वाढल्याने कुपोषण संदभार्तील चौकशी लांबणीवर पडली आहे. संबंधित अधिकाऱ्यांना लवकरच जळगाव जा. येथे बोलावून या प्रकरणी चौकशी केली जाईल.
- वैैशाली देवकर, उपविभागीय अधिकारी,
जळगाव जा.