चुका सुधारून पुढची पिढी घडविण्यासाठी कार्य करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 01:33 AM2017-10-13T01:33:41+5:302017-10-13T01:33:47+5:30
चिखली : अस्वच्छता आणि घाणीमुळे रोगराई पसरते व त्यामुळे आपल्या देशात आजारी पडणारांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. वर्षानुवर्षांपासून आपण करीत असलेल्या चुकांमुळे आपणच देशाचे एकप्रकारे आर्थिक नुकसान करीत आलो आहोत.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : अस्वच्छता आणि घाणीमुळे रोगराई पसरते व त्यामुळे आपल्या देशात आजारी पडणारांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. वर्षानुवर्षांपासून आपण करीत असलेल्या चुकांमुळे आपणच देशाचे एकप्रकारे आर्थिक नुकसान करीत आलो आहोत. केवळ देशभक्तीपर गीते गाऊन देशभक्ती सिद्ध होत नाही, तर देशाला सुदृढ आणि निरोगी बनविणार्या स्वच्छ भारत अभियान यशस्वीपणे राबवून देशाला प्रगतिपथाकडे नेण्यासाठी कार्य करा, उघड्यावर शौचास बसणे, अस्वच्छ पाणी पिणे अशा चुका आपण करीत आलो; परंतु आता त्या टाळून भावी पिढी घडविण्यासाठी कार्य करा, असे आवाहन स्वच्छतादूत आदर्श ग्राम पाटोदाचे सरपंच भास्करराव पेरे यांनी केले.
तालुक्यातील मंगरूळ (इ.) येथे स्वच्छता अभियानांतर्गत शुक्रवारी सायंकाळी ८ वाजता आयोजित विशेष सभेत सरपंच पेरे पाटील बोलत होते. यावेळी त्यांनी आदर्श ग्राम पाटोदा येथे राबविलेल्या विविध योजना व अभियानाविषयी ग्रामस्थांना सखोल माहिती दिली.
तसेच सन २00५ मध्ये त्यांच्या गावात स्वच्छता अभियानांतर्गत शौचालय बांधण्यास सुरुवात केली, तेव्हा गावातील सुमारे चारशे महिलांनी बँकेचे कर्ज काढून शौचालये बांधले. आता तुम्हाला शासन बारा हजार रुपये देत असतानाही तुम्ही शौचालय का बांधत नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यासह आई-वडिलांची सेवा, पती-पत्नी यांनी एकमेकांना समजून घेणे, मुलांना चांगले शिक्षण देणे, सात्त्विक आहार, शरीरातील घाणीची योग्य विल्हेवाट लावणे ही पंचसूत्री अमलात आणून गावात स्वच्छतेची मोहीम यशस्वी करण्याबाबत सांगितले.
प्रसंगी पंचायत समितीचे सहायक गटविकास अधिकारी अमोल ताकभाते, सरपंच देवानंद गवते यांनीसुद्धा मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला प.स. सभापती संगीता पांढरे, गटविकास अधिकारी सूर्यकांत भुजबळ, सुनंदा शिनगारे, कणखर, प.स. सदस्य उषा थुट्टे, द्वारका भोसले, उद्धव पाटील, ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष रामेश्वर रिंढे, सचिव आनंद पाटील, ग्रा.प. सदस्य कावेरी शिंदे, शारदा सुरूशे, मिलिंद बोर्डे, अंबादास गवते, शिवाजी शिंदे, प्रकाश शिंदे, गणेश सुरूशे, दिनकर लोखंडे, ग्रामसेवक शेळके, सिंधू बोर्डे यांची प्रमुख उपस्थिती होती. सभेला ग्रामस्थांची बहुसंख्येने उपस्थिती होती.