दुचाकी अपघातात मुलाचा जागीच मृत्यू तर वडील गंभीररित्या जखमी
By सदानंद सिरसाट | Updated: April 28, 2024 14:45 IST2024-04-28T14:45:18+5:302024-04-28T14:45:31+5:30
महामार्गावर धरणगाव ओव्हरब्रिज नजीक दुचाकीचा अपघात

दुचाकी अपघातात मुलाचा जागीच मृत्यू तर वडील गंभीररित्या जखमी
मलकापूर (बुलढाणा) : दुचाकीच्या जबर अपघातात मुलाचा जागीच मृत्यू झाला तर पित्याला अत्यवस्थेत रुग्णालयात हलविण्यात आले. राष्ट्रीय महामार्ग ५३ वर मौजे धरणगाव ओव्हर ब्रीजनजीक रविवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
तालुक्यातील तालसवाडा येथील रहिवासी सुपडा श्रीहरी घाईट (५०), त्यांचा मुलगा अजय सुपडा घाईट (२२) हे दोघे दुचाकी क्रमांक एमएच-२८, बीपी-८७५४ ने गावातून सकाळी ८:३० वाजताच्या सुमारास घराबाहेर पडले होते. राष्ट्रीय महामार्ग ५३ वरून दोघेही पितापुत्र दुचाकीने मलकापूरकडे येत होते. सकाळी ९ वाजताच्या सुमारास तालुक्यातील धरणगाव ओव्हर ब्रीजनजीक निर्माणाधीन खड्ड्यातून दुचाकी उसळली ती डिवायडरवर जाऊन आदळली.
या अपघातात डीवायडरचा जबर मार डोक्याला लागल्याने अजय घाईट या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर सुपडा घाईट गंभीररीत्या जखमी होऊन बेशुद्ध पडले. माहिती कळताच धरणगाव येथील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी गंभीर जखमीला तत्काळ पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात हलविले. त्यांच्यावर शर्थीचे उपचार करण्यात आले. त्यामुळे सुपडा घाईट यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉ. चेतन जाधव यांनी सांगितले.
दिशादर्शकाअभावी दिशाभूल..!
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ चे चौपदरीकरण झाले आहे. मात्र, अजूनही बऱ्याच ठिकाणी काम अपूर्ण आहे. रस्त्याची ठिकठिकाणी डागडुजी व दुरुस्ती सुरू आहे. त्या-त्या ठिकाणी दिशादर्शकाचा अभाव आहे. नेमकी हीच बाब अपघातास कारणीभूत ठरत असल्याचा दावा घटनास्थळी ग्रामस्थांनी केला आहे.