बोरी अडगावात आता दरोडेखोरांसोबत युवक करणार दोन हात; ग्राम सुरक्षा दल स्थापन
By अनिल गवई | Published: June 7, 2023 06:09 PM2023-06-07T18:09:37+5:302023-06-07T18:09:56+5:30
सशस्त्र दरोड्यातून ग्रामस्थांनी घेतला बोध
खामगाव : गत ३० मे रोजीच्या सशस्त्र दरोड्यात युवक आणि महिला जखमी झाल्याचा बोध घेत, बोरी अडगाव येथील सजग युवकांनी ग्राम रक्षणासाठी पुढाकार घेतला आहे. ग्रामीण पोलिसांच्या सहकार्याने गावातील युवाशक्ती यापुढे चोर, दरोडेखाेरांशी दोन हात करण्यासाठी अग्रेसर राहणार असून, ग्राम रक्षणासाठी युवकांनी शिवराज्याभिषेक दिनाच्या पूर्वसंध्येला ग्राम सुरक्षा दलाची स्थापना केली आहे. ग्रामीण पोलिसांनी या दलाला सर्वतोपरी सुरक्षा देण्याची ग्वाही दिली आहे.
खामगाव तालुक्यातील बोरी अडगाव येथील शेत शिवारातील एका घरात ३० मे रोजीच्या रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास सशस्त्र दरोडा पडला. यात दरोडेखोरांनी लुटण्याच्या उद्देशाने चाकू हल्ला केला. यात गावातील एक महिला आणि तीन युवक जखमी झाले. चारही जण थोडक्यात बचावल्यानंतर गावातील तरुणांनी पुढाकार घेतला. गावातील युवकांच्या प्रतिसादाला सकारात्मक दृष्टिकोनातून मदतीसाठी ग्रामीण पोलिसांनी प्रयत्न केले. शिवराज्याभिषेक दिनाच्या पूर्वसंध्येला बैठक घेत ग्राम सुरक्षा दलाला गती दिली. या बैठकीला सरपंच विद्या तेजराव टिकार, पोलिस पाटील रमेश सोळंके, साहेबराव सुरवाडे, बिट अंमलदार शेख चांद, पोलिस कर्मचारी मनीष कवळकार आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुनरावृत्ती टाळण्यासाठी आवाहन
ग्रामसुरक्षा दलाच्या पहिल्याच बैठकीत ग्रामीण पोलिस स्टेशनचे निरीक्षक सुरेश नाईकनवरे यांनी अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सतर्क राहण्याचे आवाहन केले. पोलिस दलाच्या आवाहनाला प्रतिसाद देत, काही युवकांनी सुरक्षा दलात गस्त घालण्यासाठी होकार दर्शविला. त्यानंतर ग्राम सुरक्षा दलाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली.
संशयित, अनोळखींवर ठेवणार वॉच
गावात येणाऱ्या संशयित व्यक्ती तसेच अनोळखी व्यक्तींवर ग्रामसुरक्षा दलाचे सदस्य वॉच ठेवतील. तसेच प्रत्येक संशयास्पद हालचालीची माहिती ग्रामीण पोलिसांना देतील. यावेळी कायदा हातात न घेता, पोलिसांच्या मदतीने योग्य ती कारवाई करण्यासाठी पुढाकार घेण्याची प्रतिज्ञा शिवराज्याभिषेक दिनाच्या पूर्व संध्येला घेतली.
दुर्दैवी घटनेतून बोध घेत, बोरी अडगाव येथील सज्जन शक्ती एकत्र आली. ग्रामसुरक्षा दलाची स्थापना करण्याचा संकल्प केला. ग्रामरक्षणासाठी युवकांचा पुढाकार ही भूषणावह बाब आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक, अप्पर पोलिस अधीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या संकल्पनेतून ग्राम सुरक्षा दलाला मूर्त स्वरूप दिले आहे.
- सुरेश नाईकनवरे, पोलिस निरिक्षक, खामगाव ग्रामीण.