बुलडाण्यात शिवसेनेच्या शिंदे व ठाकरे गटात तुफान राडा, शाब्दिक चकमक पोहोचली हाणामारीपर्यंत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2022 09:38 AM2022-09-04T09:38:58+5:302022-09-04T09:40:25+5:30
कार्यक्रमात अचानकपणे शिंदे गटाचे कार्यकर्ते नारेबाजी करत बंदिस्त सभागृहात घुसले. तेथील खुर्च्यांची तोडफोड करत ठाकरे गटाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना धक्काबुक्की करत संजय हाडे, गाडेकर यांना मारहाण केल्याचा आरोप आहे.
बुलढाणा : शिवसेनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या सत्कार कार्यक्रमात शिंदे गटाच्या समर्थकांनी घुसून तोडफोड करत धक्काबुक्की व मारहाण केल्याची घटना शनिवारी बाजार समितीच्या सभागृहात घडली. शाब्दिक चकमक आता प्रत्यक्षात हाणामारीपर्यंत पोहोचली आहे. एकीकडे दसरा मेळाव्यासंदर्भाने दोन्ही गटांत धुसफूस वाढत असतानाच बुलडाण्यात हा राडा झाला.
ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांसह अनेक कार्यकर्त्यांना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. मात्र, पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली, असा आरोप ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकरांनी केला. शनिवारी दुपारी १ वाजता हा प्रकार घडला. पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी घटनास्थळी धाव घेतली.
नेमके काय घडले -
कार्यक्रमात अचानकपणे शिंदे गटाचे कार्यकर्ते नारेबाजी करत बंदिस्त सभागृहात घुसले. तेथील खुर्च्यांची तोडफोड करत ठाकरे गटाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना धक्काबुक्की करत संजय हाडे, गाडेकर यांना मारहाण केल्याचा आरोप आहे.
आमचे कार्यकर्ते तेथे भांडणासाठी गेेले नव्हते. अवाजवी बोलून तेथील व्यक्ती जर हातघाईवर आले तर आम्ही काय करणार? कार्यक्रमात जे बोलले त्यांना प्रसाद भेटला.
- आमदार संजय गायकवाड
पोलीस फुटेज तपासत असून, ते पाहून कारवाई केली जाईल. अद्याप पोलिसांना तक्रार प्राप्त झाली नाही. ठाकरे गटाचे पदाधिकारी आपणास भेटून गेले. त्यांनाही तक्रार देण्याबाबत सांगितले आहे.
- अरविंद चावरिया, पोलीस अधीक्षक