आसलगाव येथील ४०० विद्यार्थ्यांचा शिक्षकांच्या मागणीसाठी पंचायत समितीत ठिय्या; विद्यार्थ्यांचा ७ किमी पायी प्रवास
By विवेक चांदुरकर | Published: July 19, 2024 04:58 PM2024-07-19T16:58:58+5:302024-07-19T17:00:48+5:30
आसलगाव येथील जिल्हा परिषद माध्यमिक आणि हायस्कूलच्या जवळपास ४०० विद्यार्थ्यांनी शिक्षकांची मागणी करीत १९ जुलै रोजी पंचायत समितीमध्ये ठिय्या दिला.
विवेक चांदूरकर,जळगाव जामोद : तालुक्यातील आसलगाव येथील जिल्हा परिषद माध्यमिक आणि हायस्कूलच्या जवळपास ४०० विद्यार्थ्यांनी शिक्षकांची मागणी करीत १९ जुलै रोजी पंचायत समितीमध्ये ठिय्या दिला. आसलगाव ते जळगाव जामोद सात किमी विद्यार्थ्यांनी पायी चालत येवून आंदोलन केले. त्यामुळे शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली होती.
शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे शिक्षणाचा बट्ट्याबोळ झाला असून जिल्हा परिषद शाळा बंद पडण्याच्या मार्गावर जात आहेत. शिक्षकच नसल्याने अनेक गावांमधील विद्याथी व पालक त्रस्त आहेत. आसलगाव येथे जिल्हा परिषदेची प्राथमिक, माध्यमिक शाळा आहे. जिप हायस्कूलमध्ये शिक्षकांची कमतरता असून त्याबाबत संबंधित शिक्षण समितीने शिक्षकांच्या मागणीचे निवेदन पंचायत समितीला अनेकदा दिले होते. परंतु शिक्षकांची पदे भरण्यात आली नाहीत. त्यामुळे शाळा व्यवस्थापन समिती, सर्व पालक आणि विद्यार्थींनी आसलगावपासून सात किलोमीटर पायी चालत जळगाव जामोद पंचायत समितीमध्ये धडक दिली. शिक्षक देण्याच्या घोषणाबाजीने पंचायत समिती दणाणून सोडली. पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी उपस्थित नव्हते. तेव्हा गटशिक्षणाधिकारी वामन फंड यांच्यासोबत पालक व शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांनी चर्चा केली. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरिता तात्काळ शिक्षक देण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान एका विद्यार्थिनींला चक्कर आली. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आली. जोपर्यंत शिक्षकांची नियुक्ती करणार नाही. तोपर्यंत येथून विद्यार्थी जाणार नाहीत अशी भूमिका विद्याथींनी घेतली होती. अखेरीस चार शिक्षकांची नेमणूक करण्याचे आश्वासन दिल्यावर विद्याथी परत गेले.
शिक्षकांची ८० पदे रिक्त...
जळगाव जामोद पंचायत समिती अंतर्गत शिक्षण विभागातील शिक्षकांची ८० पदे रिक्त आहेत. नुकतेच पवित्र पोर्टलद्वारे बुलढाणा जिल्हा परिषदेमध्ये शिक्षकांच्या नियुक्ती झाल्या. परंतु जळगाव जामोद येथे शिक्षक नियुक्त करण्यात आले नाहीत.
४ शिक्षकांची तत्काळ नियुक्ती-
पालक विद्यार्थी आणि शाळा व्यवस्थापन समितीची संतप्त भूमिका लक्षात घेता गटशिक्षणाधिकारी वामन फंड यांनी तात्काळ ४ शिक्षकांना नियुक्ती देऊन आसलगाव येथे रुजू होण्याचे आदेश दिले. त्यामुळे सदर आंदोलन शांत झाले.