पुरात वाहून गेलेल्या वृद्धाचे प्रेत आढळले; चाैथ्या दिवशी घाटनांद्रा शिवारात आढळला मृतदेह
By संदीप वानखेडे | Published: June 24, 2024 03:29 PM2024-06-24T15:29:11+5:302024-06-24T15:29:40+5:30
प्रेत आनंदा अर्जुन साबळे यांचेच असल्याचे निष्पन्न झाल्याने पंचनामा करून प्रेत शवविच्छेदनासाठी मेहकर येथे रवाना केले. याप्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जानेफळ : मुसळधार पावसामुळे नदीला आलेल्या पुरात उटी येथील आनंदा अर्जुन साबळे हे २१ जून राेजी वाहून गेले हाेते. बचाव पथकाच्या वतीने तीन दिवस त्यांचा शाेध घेण्यात येत हाेता. अखेर चाैथ्या दिवशी २२ जून राेजी घाटनांद्रा शिवारात साबळे यांचा मृतदेह आढळला
उटी तालुका मेहकर येथील आनंदा अर्जुन साबळे हे जानेफळवरून गावाकडे उटी येथे जात असताना शुक्रवार, २१ जून रोजी सायंकाळ दरम्यान पुरात वाहून गेले हाेते. स्थानिक सरपंच कैलास काठोळे, पोलिस पाटील आदींनी जानेफळ पोलिस स्टेशनला माहिती कळविल्यानंतर ठाणेदार अजिनाथ मोरे यांनी तहसीलदार मेहकर यांना महिती दिली हाेती. त्यानंतर आपत्ती निवारण पथकाला पाचारण करण्याची विनंती केल्याने बुलढाणा येथील टीमने तसेच ठाणेदार अजिनाथ मोरे, बिट जमादार, महसूल मंडळ अधिकारी, तलाठी, सरपंच कैलास काठोळे तसेच गावातील नागरिकांनी पिंपरी धनगर गावापर्यंत नदी, ओढे तसेच छोट्या तलावांमध्ये साबळे यांचा शाेध घेतला हाेता.
परंतु तीन दिवस त्यांचा शाेध लागला नव्हता. २४ जून रोजी घाटनांद्रा येथील आनंदा वाथे हे आपल्या घाटनांद्रा शिवारात असलेल्या शेतात फेरफटका मारण्यासाठी गेले असता त्यांना आपल्या शेतात एका इसमाचे प्रेत पाण्यात वाहून आलेले दिसून आले. त्यामुळे त्यांनी गावात येऊन पोलिस पाटलांना माहिती दिल्याने त्यांनी जानेफळ पोलिस स्टेशनला कळविताच ठाणेदार व पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहचून पाहणी केली. त्यानंतर ते प्रेत आनंदा अर्जुन साबळे यांचेच असल्याचे निष्पन्न झाल्याने पंचनामा करून प्रेत शवविच्छेदनासाठी मेहकर येथे रवाना केले. याप्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.