बंद खात्यातून पैसे काढल्याप्रकरणी चाैकशी सुरू, सचिव व लिपिकाची पाेलिसांनी केली चाैकशी
By संदीप वानखेडे | Published: November 8, 2023 05:25 PM2023-11-08T17:25:23+5:302023-11-08T17:27:38+5:30
७ नाेव्हेंबर रोजी डोणगाव ठाणेदार यांनी ग्रामपंचायत सचिव व लिपिकास प्राथमिक चौकशीसाठी बोलावले होते.
डाेणगाव : डोणगाव ग्रामपंचायतमधील १३ व्या वित्त आयोगाचा व्यवहार बंद असलेल्या खात्यामधून सचिव व सरपंच यांनी ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता ८ लाख ३८ हजार ९०० रुपये काढल्याप्रकरणी ३० नाेव्हेंबर रोजी डोणगाव पोलिस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली होती. त्या अनुषंगाने ७ नाेव्हेंबर रोजी डोणगाव ठाणेदार यांनी ग्रामपंचायत सचिव व लिपिकास प्राथमिक चौकशीसाठी बोलावले होते.
डोणगाव येथील ग्रामपंचायतचा कारभार पाहण्यासाठी १७ सदस्य गावकऱ्यांनी निवडून दिले आहेत. गावाच्या विकासासाठी आलेल्या काेट्यवधी रुपयांच्या निधीतून विकासकामे कोणती व कशी करायची यासाठी गावाला ग्रामविकास अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. येथील सचिवाने व सरपंचांनी १३ व्या वित्त आयोगाच्या ८ वर्षांपासून व्यवहार बंद असलेल्या बँक खात्यातून परस्पर ८ लाख ३८ हजार ९०० रुपये काढण्यात आले. याची कोणतीही माहिती ग्रामपंचायत सदस्यांना देण्यात आलेली नाही. यावर डोणगाव ग्रामपंचायतच्या मासिक सभेत प्रश्न उपस्थित करण्यात आला हाेता. त्यावर सचिव शरद वानखेडे यांनी याबद्दल माहिती नाही असे सांगितले तर तत्कालीन सचिव सचिन रिंढे व सरपंच यांच्या स्वाक्षरीने हे पैसे काढण्यात आलेले होते.
याप्रकरणी डोणगाव पोलिस स्टेशनला ३० ऑक्टोबर रोजी सरपंच व सचिव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार करण्यात आली हाेती. या तक्रारीची चाैकशी करण्यासाठी ७ नोव्हेंबर रोजी प्राथमिक चौकशी करून तो अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठवून त्यांच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे ठाणेदार अमरनाथ नागरे यांनी सांगितले.