बारावीच्या निकालात मुलींचीच बाजी, जिल्ह्याचा निकाल ९०़ ४५ टक्के; नियमित विद्यार्थ्यांचा ९१़ ७८ टक्के निकाल
By संदीप वानखेडे | Published: May 21, 2024 04:06 PM2024-05-21T16:06:25+5:302024-05-21T16:07:04+5:30
चिखली तालुका जिल्ह्यात प्रथम
बुलढाणा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाच्या वतीने मार्च-२०२४ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल २१ मे राेजी जाहीर करण्यात आला. जिल्ह्यात यंदाही मुलींनीच बाजी मारली असून, निकाल ९०़ ४५ टक्के लागला आहे. नियमित विद्यार्थ्यांचा निकाल ९१़ ७८ टक्के लागला आहे. जिल्ह्यात चिखली तालुका प्रथम आला आहे.
बुलढाणा जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी यावर्षी काॅपीमुक्त अभियानाची प्रभावी अंमलबजावणी केली हाेती. तसेच ऑन कॅमेरा परीक्षा घेतल्यानंतरही निकालाची टक्केवारी कायम राहिली आहे. जिल्ह्यात यावर्षी बारावीच्या परीक्षेसाठी ३३ हजार १७७ विद्यार्थ्यांनी नाेंदणी केली हाेती. यामध्ये १८ हजार २८२ मुले आणि १४ हजार ८९५ मुलींचा समावेश आहे. त्यापैकी ३२ हजार ९६९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. जिल्ह्यातील ३० हजार २६० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये १६ हजार ३७७ मुले आणि १३ हजार ८८३ मुलींचा समावेश आहे. मुलांची उत्तीर्ण हाेण्याची टक्केवारी ९०़ ०३ टक्के तर मुलींची ९३.९३ टक्के आहे. नियमित परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा निकाल ९१़ ७८ टक्के लागला आहे.
विज्ञान शाखेचा सर्वाधिक निकाल
इयत्ता बारावीच्या विविध शाखांपैकी विज्ञान शाखेचा सर्वाधिक निकाल लागला आहे. विज्ञान शाखेचा निकाल ९७़ ७९ टक्के निकाल लागला आहे़ विज्ञान शाखेच्या १९ हजार ५८१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली हाेती. त्यापैकी १९ हजार १५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामध्ये १० हजार ८९८ मुले तर ८ हजार २५२ मुलींचा समावेश आहे. दुसऱ्या क्रमांकावर वाणिज्य शाखेचा ९०़१३ टक्के निकाल लागला आहे. वाणिज्य शाखेचे २ हजार २७४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कला शाखेचा ८१़ २९ टक्के निकाल लागला आहे. कला शाखेच्या १० हजार २८३ विद्यार्थ्यांनी नाेंदणी केली हाेती. त्यापैकी १० हजार १५७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तसेच ८ हजार २५७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. व्हाेकेशनल शाखेचा निकाल ८२़०५ टक्के लागला आहे.