जिल्ह्यातील ४८ ग्रामपंचायतींमध्ये उडाला विजयाचा गुलाल, नव्या चेहऱ्यांनाही संधी
By ब्रह्मानंद जाधव | Published: November 6, 2023 04:37 PM2023-11-06T16:37:42+5:302023-11-06T16:38:45+5:30
आता ग्रामपंचायतींच्या विजयावर वर्चस्व दाखविण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे.
बुलढाणा : जिल्ह्यातील मुदत संपलेल्या ४८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ५ नोव्हेंबरला मतदान झाल्यानंतर ६ नोव्हेंबरला मतमोजणी झाली. दुपारी ३ वाजेपर्यंत काही ठिकाणी मतमोजणी सुरू होती. ४८ ग्रामपंचायतींमध्ये विजयाचा गुलाल उधळण्यात आला. परंतु, आता ग्रामपंचायतींच्या विजयावर वर्चस्व दाखविण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे.
जिल्ह्यातील ४८ ग्रामपंचायतींसाठी रविवारी पार पडलेल्या मतदानाचा निकाल साेमवारी जाहीर करण्यात आला. प्रत्येक तालुक्यात तहसील कार्यालय परिसरात तसेच इतर नियाेजित ठिकाणी मतमाेजणी करण्यात आली. दुपारी ३ वाजेपर्यंत मतमोजणी सुरू होती. ४८ सरपंचपदांच्या विजयानंतर आता हा विजयी उमेदवार आपल्या पक्षाचा असल्याचे दाखविण्यासाठी चुरस निर्माण झाली आहे. सिंदखेड राजा तालुक्यात सात ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेण्यात आल्या. त्यामध्ये दोन ठिकाणी राष्ट्रवादी, एका ठिकाणी उबाठा तर चार ठिकाणी सर्वपक्षीय पॅनलने विजय प्राप्त केला. मेहकर तालुक्यात सात ग्रामपंचायतींसाठी निवडणुका झाल्या. तर आठ पोटनिवडणुका होत्या. त्यामध्ये चार अविरोध झाल्या. मेहकर तालुक्यात सातपैकी भाजपच्या दोन, काँग्रेस एक, शिवसेना शिंदे गटाच्या चार आहेत. लोणार तालुक्यातील तीन ग्रामपंचायींच्या निवडणुका पार पडल्या. लोणार तालुक्यात वंचित बहुजन आघाडी एक आणि दोन ग्रामपंचायतींवर शिवसेना शिंदे गटाने विजय प्राप्त केला. यामध्ये अनेक ठिकाणी दिग्गजांना पराभवाचा धक्का बसला़ तर काही ठिकाणी नविन चेहऱ्यांना संधी मिळाल्याचे चित्र आहे़.