‘बी’ ग्रेडच्या नावाखाली पाडतात केळीचे भाव; चक्क अर्ध्या दरात होतेय विक्री
By विवेक चांदुरकर | Published: August 23, 2023 07:38 PM2023-08-23T19:38:33+5:302023-08-23T19:38:52+5:30
व्यथा फळबाग उत्पादक शेतकऱ्यांच्या भाग १ - पर्याय नसल्याने विकावा लागतो शेतमाल
विवेक चांदूरकर
खामगाव : जिल्ह्यात अनेक शेतकर्यांनी परंपरागत पिकांना फाटा देत फळबागांची लागवड केली आहे. मात्र, विक्रीसाठी बाजारपेठ नसल्याने शेतकर्यांची फसवणूक होत आहे. बी ग्रेड केळी असल्याचे कारण देत व्यापारी चक्क अर्ध्या किमतीत केळी खरेदी करीत असल्याने शेतकर्यांना मोठ्या नुकसानाचा सामना करावा लागत आहे.
जिल्ह्यात सोयाबिन व कपाशी मुख्य पिक आहे. मात्र, आता अनेक शेतकरी फळबागांकडे वळले आहेत. सिंचनाची सोय उपलब्ध झाल्याने केळी, पपइ, उस, संत्र्याच्या लागवड करण्यात येत आहेत. फळबागांची विक्री करण्यासाठी जिल्ह्यात मोठी बाजारपेठ नाही. फळबागा खरेदी करणारे जिल्ह्यात काही मोजकेच व्यापारी आहेत. परजिल्ह्यातील व्यापारी फळांची खरेदी करण्याकरिता येतात. व्यापारी स्वत: शेतामध्ये जावून केळीची खरेदी करतात. खरेदी करताना ‘ए’ व ‘बी’ ग्रेडमध्ये विभागणी करण्यात येते. ए ग्रेडच्या केळीला १२०० रूपये भाव मिळत असून, बी ग्रेड केळीला केवळ ५०० ते ६०० रूपये क्विंटल भाव मिळत आहे. केळीच्या घडाच्या खालील फणीला बी ग्रेड म्हणून कमी भाव देण्यात येतो. व्यापार्यांनी ठरविल्यानुसार शेतकर्यांना दर द्यावा लागतो. शेतकर्यांकडे दुसरा पर्याय नसल्याने नुकसान झाल्यावरही केळी त्याच भावात विकावी लागते.
व्यापारी ‘ए’ व ‘बी’ ग्रेड ठरवतात. बी दर्जाचा माल सांगून भाव कमी करतात. सध्या १२०० - १३०० रूपये क्विंटल भाव सुरू आहे. बी दर्जाचा भाव ६०० ते ६५० रूपये आहे. आपल्याकडे पर्याय नसल्याने व्यापारी सांगेल त्या भावात केळीची विक्री करावी लागते. बुलढाणा जिल्ह्यात मार्केट उपलब्ध व्हायला हवे.
- नामदेव वाकूडकर, केळी उत्पादक शेतकरी, दिवठाणा
केळीची विक्री करताना एक नंबर व दोन नंबर ठरविण्यात येतात. बरेचदा चांगल्या केळीलाही व्यापारी दोन नंबरचे ठरवतात. त्यामुळे कमी भाव मिळतो. एक नंबरला १२०० रूपये तर दोन नंबरला फक्त ५०० ते ६०० रूपये प्रतिक्विंटलच भाव मिळतो. विक्रीसाठी दुसरा पर्याय नसल्याने नाइलाजास्तव कमी भावात विकावे लागते.
- केळी उत्पादक शेकरी, वरवट बकाल