जागतिक तृणधान्य वर्षातच ‘मिलेट मिशन’ला शेतकऱ्यांचा खो
By विवेक चांदुरकर | Published: November 21, 2023 06:10 PM2023-11-21T18:10:44+5:302023-11-21T18:11:40+5:30
तृणधान्याच्या पेरणीकडे फिरविली पाठ,हरभऱ्याला प्राधान्य.
खामगाव : २०२३ - २४ हे पोष्टीक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. या वर्षात तृणधान्याची पेरणी वाढावी याकरिता कृषी विभागाच्या वतीने ‘मिलेट मिशन’ राबभियान राबविले. मात्र, पावसाळ्यात अल्प पाऊस झाल्याने जमिनीत ओल नसल्याने शेतकर्यांनी गळीत व तृणधान्य पेरणीकडे पाठ फिरविली आहे. हरभर्याची पेरणी मात्र वाढली आहे.
यावर्षी जागतिक तृण धान्य वर्ष साजरे करण्यात येत आहे. तृणधान्याचा पेरा कमी झाला आहे. तो वाढविण्याकरिता या वर्षात कृषी विभागाच्यावतीने विशेष प्रयत्न करण्यात आले. मिलेट मिशन अंतर्गत शाळा शाळांमध्ये जावून विद्याथींनी तृणधान्याचे महत्व सांगण्यात आले. मिलेट दौंडचे आयोजन करण्यात आले. यामध्ये विजयी स्पर्धकांना तृणधान्याच्या किटच बक्षीस स्वरूपात देण्यात आल्या. तृणधान्याच्या पाककला स्पर्धाही घेण्यात आल्या. शेतकर्यांना मिनी किटचेही वाटप करण्यात आले. तसेच शिबीरे घेवून शेतकर्यांना तृण धान्याची लागवड करण्याबाबत आवाहन करण्यात आले. मात्र, पावसाने हुलकावणी दिल्याने खामगाव, मलकापूर, मोताळा, जळगाव जामोद तालुक्यातील शेतकर्यांनी कृषी विभागाच्या आवाहनाला खो दिला. तृणधान्याच्या पेरणीकडे पाठ फिरवित हरभर्याच्या पेरणीला प्राधान्य दिले आहे. खामगाव तालुक्यात रब्बी ज्वारीची ८.०९ टक्के, बागायती गव्हाची ५.५५ टक्के, मक्याची ५.४१ टक्के अशी तृणधान्याची केवळ ५.५६ टक्केच पेरणी झाली आहे. तसेच मलकापूर तालुक्यात रब्बी ज्वारी २२.२२ टक्के, बागायत गहू ३.९१ टक्के, मका ३.४९ टक्के अशी तृणधान्याची केवळ ३.९० टक्के पेरणी झाली आहे. मोताळा तालुक्यात तृणधान्याची ९.८३ टक्के, जळगाव जामोद तालुक्यात १२.२८ टक्केच पेरणी झाली आहे.
अल्प पावसाने पेरणी प्रभावित
यावर्षी पावसाळ्यात कमी पाऊस झाला. पाऊस उशीरा झाल्याने उडिद व मुगाची पेरणी अल्प प्रमाणात करण्यात आली. तसेच पावसाचा दोन ते तीन वेळा १५ दिवसांपेक्षा जास्त खंडही पडला. त्यामुळे खरीप हंगामातील सोयाबिन, कपाशीचे पीक प्रभावित झाले. सध्या कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे कपाशीचे नुकसान होत आहे. पावसाचा लहरीपणा व किडींच्या प्रादुर्भावामुळे खरीप हंगामातील पिकांच्या उत्पादनात घट आल्याने शेतकर्यांना रब्बी हंगामातील पिकांपासून अपेक्षा होती. मात्र, पावसाळ्यात कमी पाऊस झाल्याने जमिनीत ओल नाही. त्यामुळे रब्बी हंगामातील पेरणीही प्रभावित झाली आहे.
जिल्ह्यात ५३ टक्के पेरणी;पिकाचे नाव पेरणी हेक्टर टक्केवारी
रब्बी ज्वारी ६४२३.६० ५०.३४
बागायत गहू १३७५२.०० २४.८२
मका २७११ २३.०२
हरभरा ९८०७८.७० ६६.९७
करडइ ७००.३० ६७३.४९
जवस ०० ००
तीळ ०० ००
सुर्यफूल २४.५० ५४.६९
एकूण १२१९४१.९० ५३.६७