राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते अनावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2019 07:05 PM2019-08-16T19:05:35+5:302019-08-16T19:05:49+5:30
बोधचिन्हाचे अनावरण १५ आॅगस्ट रोजी कामगार मंत्री तथा पालकमंत्री डॉ. संजय कुटे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले.
बुलडाणा: राज्य साहित्य आमि सांस्कृतिक मंडळाच्या सहकार्याने बुलडाण्यात २५ आॅगस्ट रोजी प्रगती वाचनालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण १५ आॅगस्ट रोजी कामगार मंत्री तथा पालकमंत्री डॉ. संजय कुटे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले. स्वातंत्र्य दिनाच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या मुख्य कार्यक्रमादरम्यान हे अनावरण करण्यात आले. राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षा डॉ. प्रभाताई चिंचोले आणि प्रगती सार्वजनिक वाचनालयाच्या अध्यक्षा अरुणा किल्ले यांच्या विनंतीवरून पालकमंत्री डॉ. संजय कुटे, जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन एस. यांच्या हस्ते साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाची संकल्पना नरेंद्र लांजेवार यांची असून या बोधचिन्हाची निर्मिती चित्रकार सुलेखनकार गोपाल वाकोडे आणि सुभाष लहासे यांनी केली आहे. या बोधचिन्हात ग्रंथ, मशाल, लेखणी आणि महिला यांची एकात्म मांडणी उद्बोधकपणे करण्यात आली आहे. शब्द, प्रकाश आणि निर्मिती यांच्या त्रिवेणी संगम या बोधचिन्हात दर्शविण्यात आला आहे. कलात्मकता, वैचारिक आणि जीवनानुभिमुखता याचे समाजाला अधिष्ठान असायला हवे असा विचार या बोधचिन्हातून व्यक्त करण्यात आला आहे. लेखणीचा प्रकाश शेवटच्या महिलेपर्यंत पोहोचला पाहिजे आणि प्रत्येक महिलेच्या जीवनाला पुस्तकाचा स्पर्श झाला पाहिजे, पुस्तकाचा स्पर्श झाला तरच महिला आत्मविश्वासाने लेखणी हातात घेईल व याच लेखणीची मशाल करून समाजाला दिशा दाखवेल असा आशावाद या बोधचिन्ह मधून व्यक्त करण्यात आला आहे. या बोधचिन्हाच्या अनावरण प्रसंगी प्रगती वाचनालयाचे सचिव नरेंद्र लांजेवार, संमेलन कोषाध्यक्ष डॉ. माधवी जवरे, विदर्भ साहित्य संघाच्या बुलडाणा शाखेच्या अध्यक्षा डॉ. विजया काकडे, वैशाली तायडे, डॉ. वर्षा सिरसाठ, अशा शहाणे, डॉ. नंदिनी रींढे, प्रा. डॉ. अनंत सिरसाट, प्रा. सुनील देशमुख, पुरुषोत्तम गणगे, पंजाबराव गायकवाड , पु. दा. गणणे यांच्यासह अन्य उपस्थित होते.