बुलडाणा जिल्ह्यात संततधार पाऊस; अनेक गावांचा संपर्क तुटला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2020 11:04 AM2020-08-18T11:04:41+5:302020-08-18T11:04:54+5:30
पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला असून, काही मार्गावरील वाहतूकही ठप्प झाली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : चार दिवसापासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू असून, अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. जिल्ह्यात ६७.६० टक्के पावसाची नोंद झाली आहे. सोमवारी दिवसभर सर्वत्र पाऊस सुरू होता. जिल्ह्यात गेल्या २४ तासात १४.९ मि.मी. पाऊस झाला आहे. या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला असून, काही मार्गावरील वाहतूकही ठप्प झाली होती.
रविवारी रात्रीपासून या पावसाचा जोर वाढला आहे. सोमवारी दिवसभर सर्वत्र पाऊस होता. रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यात ६५.६५ टक्के पाऊस झाला आहे. त्यानंतर गेल्या २४ तासामध्ये १४.९ मि.मी. पाऊस झाला असून, दोन टक्याने वाढ यामध्ये झाली आहे. सिंदखेड राजा तालुक्यात एकाच दिवशी ३६.९ मि.मी. व लोणार तालुक्यात ३१.६ मि.मी. पाऊस झाला आहे. एकूण पर्जन्यमानाच्या सरासरीच्या तुलनेत ६७.६० टक्के पाऊस जिल्ह्यात झाला आहे. या संततधार पावसामुळे काही भागातील तलाव ओव्हर फ्लो झाले आहेत. जलसाठ्यातही चांगलीच वाढ झाल्याचे दिसून येते. १६ आॅगस्ट ते १७ आॅगस्ट रोजी सकाळी आठ वाजेपर्यंत गेल्या २४ तासामध्ये बुलडाणा तालुक्यात ७.२ मि.मी., चिखली २८.६ मि.मी, देऊळगाव राजा १४.९, सिंदखेड राजा ३६.९, लोणार ३१.६, मेहकर २१.८, खामगाव ६.८, शेगाव ५.०, मलकापूर ६.५, नांदूरा ७.५, मोताळा ६.७, संग्रामपूर १५.३ व जळगाव जा. तालुक्यात ४.४. मि.मी. पाऊस झाला आहे.
पुरातून मुलगा बचावला
पिंपळगाव सराई : सैलानी येथील नदीच्या पुरातून बाहेरगावचा १५ वर्षीय मुलगा वाहून गेला होता. परंतु जांभळीवाले बाबा दर्गाजवळ कैलास मिस्तरी, शे.अरबाज शे.अफसर, शे.सोहब शे.अफसर, शे.हारुण शे.सुलतान यांनी त्याला नदीतून बाहेर काढून त्याचे प्राण वाचविले. त्या मुलाला नदीत वाहल्यामुळे डोक्याला मार लागला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले. त्या मुलासोबत त्याची आई होती. सैलानी दर्गा येथे मुलाच्या उपचारासाठी ते आले होते. या परिसरात मुसळधार पाऊस पडल्यामुळे सैलानी येथील तलाव पूर्णत: भरला असून तो फुटण्याच्या मार्गावर आहे.
येळगाव धरण भरले
बुलडाणा तालुक्यातील येळगाव धरणही १०० टक्के भरले आहे. मागील वर्षीही हे धरण लवकरच ओव्हर फ्लो झाले होते. या धरणाचे दरवाजे उघडले आहेत.
दोघांचे प्राण वाचले
बुलडाणा तालुक्यातील पांग्री येथील पुलावरून पाणी वाहत होते. त्यामुळे अनेक नागरिक पुलाच्या पलीकडे अडकून पडले होते. परंतू एका युवकाने या पाण्यातून दुचाकी काढण्याचा प्रयत्न केला असता, पाण्याचा वेग जास्त असल्याने दुचाकी वाहून गेली. सुदैवाने या पुरातून दोघांचे प्राण वाचले. पुरामुळे बुलडाणा-रायपूर रस्ता बंद झाला.