रानभाज्याचा मानवी आहारात समावेश महत्त्वाचा - देशमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:36 AM2021-08-15T04:36:18+5:302021-08-15T04:36:18+5:30
मेहकर: रान भाज्यांमध्ये अनेक औषध गुणधर्म असल्याने या रानभाज्या महत्त्वपूर्ण आहेत; मात्र या रानभाज्या सद्यपरिस्थितीत लुप्त होत असून, नवीन ...
मेहकर: रान भाज्यांमध्ये अनेक औषध गुणधर्म असल्याने या रानभाज्या महत्त्वपूर्ण आहेत; मात्र या रानभाज्या सद्यपरिस्थितीत लुप्त होत असून, नवीन पिढीला त्यांची ओळख सुद्धा नाही. या रानभाज्यांचे मानवी आहारात असणे हे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद विरोधी पक्षनेते दिलीप देशमुख यांनी केले. जागतिक आदिवासी दिनानिमित्त तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्यावतीने रानभाजी महोत्सवाचे १३ ऑगस्ट रोजी आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
या महोत्सवाचे उद्घाटन अंत्री देशमुख येथील कृषी सखी वर्षा देशमुख, रेखा गवई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भुजंगराव म्हस्के, तालुका कृषी अधिकारी किशोर काळे, मंडळ कृषी अधिकारी प्रवीण गाडेकर, सुधाकर कंकाळ, उद्धव काळे, विनोद मोरे, कृषी पर्यवेक्षक राजूरकर, रमेश सुरूजुशे, अमोल सुळकर यांच्यासह सर्व कृषी सहायक, कृषिसेवक, कृषी मित्र व शेतकरी उपस्थित होते. मानवी आहारात प्रामुख्याने वनस्पतीचा समावेश असतो. धान्य कडधान्य यांच्यानंतर मानवी आहारातील प्रमुख घटक म्हणजे भाजी. बाजारात उपलब्ध होणाऱ्या भाज्या उत्पादन करताना मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा वापर होत आहे. त्यामुळे भाजी उत्पादनात वाढ होत आहे; परंतु भाजीची नैसर्गिक चव व प्रतिकारशक्ती कमी होत चालली आहे.
पावसाळ्यात विविध गुणधर्म असणाऱ्या अनेक वनस्पती उगवतात. त्यातील अनेक वनस्पती खाण्याजोग्या असतात, तसेच बऱ्याच वनस्पती या मधुमेह, पोटदुखी, खोकला व इतर औषध म्हणून उपयुक्त आहेत. याच रानभाज्यांबाबत शहरातील नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता असते. या रानभाज्यांची ओळख आणि त्यांचे पौष्टिक व वैद्यकीय गुणधर्म जाणून घेण्यासाठी आदिवासी दिनानिमित्त १३ ऑगस्ट रोजी तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे रान भाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.
शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद
या मेळाव्यात प्रामुख्याने करटोली, दिंडा, कुंदा, तरोटा, पाथरी, शेवगा, अंबाडी, केना, अळू, बांबू, कुरडू, आघाडा, काटेमाट, चीवळ,घोळभाजी, भुईआवळा ,उंबर, कवट, हडसन , तांदूळ कुंद्रा इत्यादी भाज्यांची ओळख करून देण्यात आली. त्यानिमित्त तालुक्यातील शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
बाजारामध्ये विक्रीसाठी येणाऱ्या भाज्या उत्पादित करताना रासायनिक औषध व कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने ते हानीकारक आहे. यामुळे सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलेल्या, तसेच आपल्या अवतीभोवती उत्पादित होणाऱ्या रानभाज्यांचा आहारात समावेश करावा.
-वर्षा देशमुख, कृषी सखी, अंत्री देशमुख.