थेट सरपंच निवडीने ग्रामपंचायत निवडणुकीत चुरस, तालुक्यातील ११ गावांचा समावेश
By ब्रह्मानंद जाधव | Published: October 13, 2023 04:52 PM2023-10-13T16:52:06+5:302023-10-13T16:52:16+5:30
स्थानिक राजकारणाचा कणा समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुका या महत्त्वपूर्ण आहेत. ग्रामीण भागातील राजकारणावर पकड मजबूत करण्याचे हे एक प्रभावी माध्यम आहे.
चिखली : नोव्हेंबर ते डिसेंबर या कालावधीत कार्यकाळ पूर्ण होणाऱ्या तसेच २०२२ मध्ये प्रभागरचनेत झालेल्या गोंधळामुळे निवडणूक लांबलेल्या तालुक्यातील एकूण ११ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. यामध्ये नऊ ग्रामपंचायतींवर सरपंचाची निवड थेट जनतेतून होणार असल्याने चुरस वाढली आहे.
स्थानिक राजकारणाचा कणा समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुका या महत्त्वपूर्ण आहेत. ग्रामीण भागातील राजकारणावर पकड मजबूत करण्याचे हे एक प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी या निवडणुकीत रस घेतला आहे. निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होताच सरपंच आणि सदस्यपदासाठी कोणते उमेदवार सरस ठरू शकतात, याची चाचपणी सध्या सुरू आहे. दरम्यान, ग्रामपंचायतची निवडणूक ही कुठल्याही राजकीय पक्षाच्या चिन्हावर लढविली जात नसली तरी स्थानिक स्तरावर पॅनल तयार करून या निवडणुका राजकीय पक्षांच्या नेतृत्वात लढविल्या जातात. त्यातच सरपंचाची निवड ही थेट जनतेतून करण्यात येणार आहे. त्यामुळे या निवडणुकीला अधिक महत्त्व आले आहे. निवडणुका जाहीर झाल्यानंतर ग्रामीण भागातील राजकारण तापले असून गावातील चावडीवर आता निवडणुकीच्या चर्चा सुरू झाल्याचे चित्र आहे. दरम्यान निवडणूक प्रक्रियेचे काम तहसीलदार सुरेश कव्हळे यांच्या मार्गदर्शनात निवडणूक निर्णय अधिकारी व्ही. आर. वैराळ, शिवशंकर चेके, एन. जे. उगले पाहत आहेत.
निवडणुकीचे गावे व सरपंचपदाचे आरक्षण
तालुक्यातील ९ गावांच्या सरपंचपदासाठी अंबाशी, करणखेड, मेरा खु., वरखेड, शेलगाव जहाँगीर या पाच गावांमध्ये सर्वसाधारण, असोला बु. अनु.जाती महिला, खंडाळा मकरध्वज सर्वसाधारण महिला, डोंगर शेवली नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि धानोरी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला असे आरक्षण आहे. प्रभाग रचनेतील गोंधळामुळे नायगाव बु., उदयनगर (उंद्री), किन्ही नाईक या तीन गावांमध्ये रिक्त सदस्यपदासाठी निवडणूक होणार आहे. एकूण ११ ग्रा. पं. निवडणुकीतून ८० सदस्यपदासांठी ही निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
५ नोव्हेंबरला होणार मतदान
या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी १६ ते २० ऑक्टोबर ही अंतिम तारीख आहे. दाखल उमेदवारी अर्जाची छाननी २३ ऑक्टोबरला, तर दाखल उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख २५ ऑक्टोबरला दुपारी ३ वाजेपर्यंत आहे. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. त्यानंतर निवडणूक रिंगणात उभे असणाऱ्या उमेदवारासाठी ५ नोव्हेंबरला मतदान आणि ६ नोव्हेंबरला मतमोजणी केली जाणार आहे.