कोरोना संसर्गात वाढ; सतर्कता गरजेची- सुमन चंद्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 06:25 PM2020-06-20T18:25:54+5:302020-06-20T18:26:07+5:30
वाढते संक्रमण पाहता मृत्यू रोखण्याचे आव्हान असून संक्रमण रोखण्यासाठी सतर्क राहणे गरजेचे आहे.
- नीलेश जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: जिल्ह्यात सध्या कोरोनाचे संक्रमण वाढत आहे. लॉकडाऊन दरम्यान प्रशासकीय पातळीवर आरोग्य विषयक पायाभूत सुविधा निर्माण करण्यास प्राधान्य दिले गेले. आता वाढते संक्रमण पाहता मृत्यू रोखण्याचे आव्हान असून संक्रमण रोखण्यासाठी सतर्क राहणे गरजेचे आहे. आपत्कालीन स्थितीसाठी जिल्ह्यात आॅक्सीजन सिलींडरची संख्या वाढविण्यात येत आहे. तसेच लोणार सरोवर विकास आराखड्याच्या संदर्भाने प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र कोरोना संसर्गामुळे काही उदिष्ठ साध्य करता आले नाहीत, मात्र सरोवर विकासासंदर्भात प्रशासन कटीबद्ध असल्याची भूमिका जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केली.
वाढते कोरोना संक्रम रोखण्यासाठी काय उपाययोजना केल्या आहेत. ?
कोरोना संक्रम सध्या वाढत आहे. त्यादृष्टीने त्रिस्तरीय रचनेमध्ये कोवीड केअर सेंटर, कोवीड हेल्थ सेंटर व डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल अशी रचना आपण केली असून त्यात जवळपास चार हजार बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.
लॉकडाऊन काळात आरोग्य विषयक पायाभूत सुविधा उभारण्यात आल्या का?
हो,लॉकडाऊन काळात आरोग्य विषयक पायाभूत सुविधा उभारण्यात आल्या आहेत. देशाच्या एकूण जिडीपीच्या अवघा चार टक्के खर्च हा आरोग्य क्षेत्रावर होतो. कोरोना संसर्गामुळे तो वाढविण्यात आला असून बुलडाणा जिल्ह्यातही पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येत आहे. टाटा ट्रस्टच्या माध्यमातूनही डेडीकेटेड कोवीड रुग्णालय उभे राहत असून १५ जुलै पर्यंत येथील कामे पूर्ण होतील.
कोरोना संक्रमणाची जिल्ह्यात सध्या दुसरी लाट आली आहे का?
नाही. जिल्ह्यात कोरोनाची फस्ट स्टेजच आहे. त्यामुळे दुसºया लाटेचा प्रश्न अद्याप नाही. आपण शुन्यावर आलो होतो. परंतू स्थलांतरीत स्वगृही परतल्याने त्यांच्यासोबत काही संक्रमीत व्यक्तीही आल्या व त्यातून जिल्ह्यात संक्रमण वाढले. ते नियंत्रीत ठेवण्याचे प्रयत्न आहेत.
लोणार सरोवर विकासाबाबत नेमकी स्थिती काय?
लोणार सरोवर विकास आराखड्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले जात आहे. त्याचे नियोजनही झाले आहे. परंतू कोरोना संसर्गामुळे त्यात काही प्रमाणाच अडचणी आल्या आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार येथील कामाला प्राधान्य देण्यात येत आहे. सरोवर संवर्धन व परिसर विकासासाठी प्रशासकीय पातळीवर नियोजन करण्यात आलेले आहे. मात्र कोरोना संसर्गामुळे त्याची प्रभावी अंमलबजावणी करता आली नाही. मात्र जिल्हा प्रशासन गुणात्मक व दर्जेदार काम या ठिकाणी करण्यासाठी कटीबद्ध आहे.
सीएसआर फंडातूनही जिल्ह्याला कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मदत होत असून ओएनजीसीकडून लवकरच जिल्ह्यात आणखी आॅक्सीजन सिलींडर येत आहेत. जिल्ह्यात कोरोनामुळे सात मृत्यू झाले आहेत. कोरोना संसर्गाची फस्ट स्टेज सध्या पिकींगला आहे. मलकापूरची स्थिती नियंत्रीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कोवीड संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात त्रिस्तरीय रचनेच्या माघ्यमातून प्रयत्न सुरू असून आॅक्सीजन सिलींडरची संख्या वाढवत आहोत- सुमन चंद्रा