अकृषक आदेशप्रकरणातील आरोपींच्या कोठडीत वाढ
By admin | Published: June 29, 2017 12:04 AM2017-06-29T00:04:11+5:302017-06-29T00:04:11+5:30
चिखली : बनावट अकृषक आदेशप्रकरणी चिखली पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींच्या कोठडीत चार दिवसांची वाढ झाली आहे.
चिखली : बनावट अकृषक आदेशप्रकरणी चिखली पोलिसांनी अटक केलेल्या तत्कालीन तलाठी रियाज शेख व उपविभागीय अधिकारी बुलडाणा यांच्या कार्यालयातील तत्कालीन स्टेनो विजय गोविंदराव जाधव व त्याचा खासगी एजंट सचिन उर्फ पप्पू दिनकरराव देशमुख या तिघांच्या पोलीस कोठडीत चार दिवसांची वाढ झाली आहे.
बनावट अकृषक आदेशप्रकरणात चिखलीतील भूखंडधारकांसह तत्कालीन नायब तहसीलदार डब्ल्यू.एस. मोरे, मंडळ अधिकारी अशोक वाळके व तलाठी रियाज शेख, असे एकूण १६ जणांवर महसूल विभागाने मोठी कारवाई करून फौजदारी गुन्हे दाखल करण्याची कारवाई ८ आॅक्टोबर २०१६ रोजी केली आहे. यामध्ये आणखी दोघांची भर पडून उपविभागीय अधिकारी बुलडाणा यांच्या कार्यालयातील तत्कालीन स्टेनो विजय गोविंदराव जाधव व त्याचा खासगी एजंट सचिन ऊर्फ पप्पू दिनकरराव देशमुख या दोघांना २४ जून रोजी पहाटे २ वाजेदरम्यान पोलिसांनी अटक केली होती व या दोघांना मेहकर न्यायालयाने २८ जूनपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली होती. या प्रकरणात न्यायालयापुढे शरणागती पत्करलेल्या तलाठी रियाज शेख यालादेखील २८ जूनपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली होती.