जलसंधारणामुळे भूजल पातळीत वाढ
By admin | Published: December 31, 2014 12:29 AM2014-12-31T00:29:24+5:302014-12-31T00:29:24+5:30
बुलडाणा जिल्ह्यात सरासरी एक फूट वाढ : १३ पैकी पाच तालुक्यात घट.
हर्षनंदन वाघ / बुलडाणा
यावर्षी सरासरी पावसात घट निर्माण झाली असली तरी मागिल वर्षी जलसंधारण व गाळ काढण्याची कामे मोठय़ा प्रमाणात झाल्यामुळे जिल्ह्यात सरासरी भूजल पातळीमध्ये एक फूट वाढ झाली आहे, तर १३ तालुक्यांपैकी पाच तालुक्यात 0.४२ मीटर घट झाल्याचे दिसून येत आहे.
विविध प्रकारच्या प्रदूषणात झालेली वाढ, निसर्गाचा वाढलेला असमतोल, मोठय़ा प्रमाणात होत असलेली झाडांची कत्तल, त्यामुळे दरवर्षी पावसाचे प्रमाण कमी होत आहे. यावर्षी जिल्ह्यात सरासरी ३0 टक्के पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला तीव्र पाणीटंचाईची शक्यता वर्तविण्यात आली होती.
जिल्हाधिकारी किरण कुरूंदकर व विविध सामाजिक संघटनांच्या सहकार्याने सर्वत्र जलसंधारण व गाळ काढण्याचा कार्यक्रम मोठय़ा प्रमाणात राबविण्यात आला. त्यामुळे पाणीटंचाईची तीव्रता कमी झाली असून, आठ तालुक्यात 0.६६ मीटर वाढ झाल्याचे दिसून येत आहे. याबाबत भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने जिल्ह्यातील १६७ निरीक्षण विहिरींचे सर्वेक्षण केले. त्यावरून जिल्ह्यातील १३ तालुक्यांपैकी आठ तालुक्यात सरासरी 0.६६ मीटर वाढ झाल्याचे दिसून आले आहे. चिखली तालुक्यात १४ निरीक्षण विहिरींचे सर्वेक्षण करण्यात आले असून, 0.२३ मीटर वाढ दिसून आली. मेहकर तालुक्यात २१ विहिरींचे सर्वेक्षण केले असता 0.५३ मीटर, सिंदखेडराजा तालुक्यात १३ विहिरींचे सर्वेक्षण केले असता 0.५५ मीटर, मलकापूर तालुक्यातील १0 विहिरींचे सर्वेक्षण केले असता 0.७४ मीटर, मोताळा तालुक्यातील १३ विहिरींचे सर्वेक्षण केले असता 0.६९ मीटर, नांदुरा तालुक्यातील १0 विहिरींचे सर्वेक्षण केले असता 0.४८ मीटर, जळगाव जामोद तालुक्यातील सात विहिरींचे सर्वेक्षण केले असता १.३५ मीटर, संग्रामपूर तालुक्यातील १४ विहिरींचे सर्वेक्षण केले असता 0.७४ मीटर अशा प्रकारे आठ तालुक्यात 0.६६ मीटर भूजल पातळीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
दरवर्षीपेक्षा यावर्षी जिल्ह्याच्या भूजल पातळीत १ फुट वाढ झाली आहे. मागिल वर्षी जिल्हाधिकारी कुरूंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेले विविध जलसंधारणाची कामे व गाळ काढण्याच्या कामामुळे भूजल पातळीत वाढ झाली असल्याचे , भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक डॉ.व्ही.पी.कथने यांनी सांगीतले.