मुगाच्या भावात ५ हजारांनी वाढ; १२ हजार रुपये प्रतिक्विंटल मिळतोय दर
By विवेक चांदुरकर | Published: September 6, 2023 03:49 PM2023-09-06T15:49:07+5:302023-09-06T15:49:26+5:30
जून महिन्यामध्ये पेरणीयोग्य पाऊस झाला नाही. त्यामुळे पेरण्यांना विलंब झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : खरीप हंगामात पेरणी केलेल्या मूग व उडदाची काढणी सुरू झाली आहे. बाजार समितीत विक्रीला आणण्यात येत आहे. मुगाच्या भावात गत काही दिवसांत पाच हजार रुपयांनी वाढ झाली असून, खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत १२ हजार रुपये प्रतिक्विंटल दराने मुगाची खरेदी करण्यात येत आहे. गत काही दिवसांत मुगाच्या भावात ४ ते ५ हजार रुपयांनी वाढ झाली आहे.
यावर्षी जून महिन्यामध्ये पेरणीयोग्य पाऊस झाला नाही. त्यामुळे पेरण्यांना विलंब झाला. मूग व उडदाची पेरणी जून महिन्यात करण्यात येते. यावर्षी पाऊस नसल्याने जिल्ह्यात मुगाची केवळ ३६ टक्के तर उडदाची ३३ टक्केच पेरणी झाली. जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात चांगला पाऊस झाला. त्यानंतर मात्र पावसाचा खंड पडला. जिल्ह्यात काही तालुक्यांमध्ये २० दिवसांपेक्षा जास्त पावसाचा खंड पडला आहे. त्यामुळे पिके सुकली आहेत. काही शेतकऱ्यांनी पीक मोडायला सुरुवात केली आहे. ऐन फुलोऱ्याच्या वेळी पावसाचा खंड पडल्याने उत्पादनात प्रचंड घट येणार आहे. त्यामुळे यावर्षी बाजार समितीत आवक कमी होणार आहे. परिणामी, भाववाढ होणार असल्याचा अंदाज व्यापारी वर्तवीत आहेत.
यावर्षी मुगाची केवळ ३६ टक्के पेरणी
जिल्ह्यात मुगाचे सरासरी पेरणीक्षेत्र २० हजार ४०५ हेक्टर आहे. त्यापैकी केवळ ७ हजार ४१५ हेक्टरवर ३६.३४ टक्केच पेरणी झाली. तसेच उडदाचे सरासरी पेरणीक्षेत्र २२६९७ हेक्टर आहे. त्यापैकी ७५४९ हेक्टरवर ३३.२६ टक्केच पेरणी झाली. संग्रामपूर तालुक्यात १०२६ हेक्टर पेरणी क्षेत्र आहे. त्यापैकी केवळ २७ हेक्टरवर म्हणजे २.६३ टक्केच पेरणी झाली. उडदाचे सरासरी पेरणीक्षेत्र ११६३ हेक्टर असून १५३ हेक्टरवर १३.१५ टक्केच पेरणी झाली आहे.
मुगाला दहा हजार ते बारा हजार रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. यावर्षी आवक कमी असल्यामुळे भाव वाढले आहे. तसेच आगामी काळातही यावर्षी उत्पादन कमी असल्याने भाववाढ होण्याची शक्यता आहे. सध्या आवक कमी आहे.
- मयूर टिबडेवाल, व्यापारी, खामगाव
-----------
मूगाचे गत सहा दिवसातील दर
तारिख भाव (प्रतिव्किंटल)
१ सप्टेंबर ९५०१
२ सप्टेंबर ७५००
४ सप्टेंबर १००००
५ सप्टेंबर १२२०१