परतीच्या पावसामुळे जलसाठय़ात वाढ!
By admin | Published: October 3, 2016 02:46 AM2016-10-03T02:46:49+5:302016-10-03T02:46:49+5:30
खामगाव तालुक्यातील रब्बी पिकांसाठी वाढता जलसाठा उपयुक्त.
खामगाव (जि. बुलडाणा), दि. २- गेल्या आठवड्यापासून परतीच्या पावसाने दमदार पुनरागमन केल्याने जलसाठय़ात अपेक्षित वाढ झाली आहे. वाढत्या जलसाठा रब्बी हंगामासाठी उपयुक्त ठरणार असून, सिंचन क्षेत्रामध्ये नक्कीच वाढ होईल. परतीचा पाऊस असाच तालुक्यातील काही दिवस कायम राहिल्यास यावर्षी सर्वच प्रकल्प तुडुंब होण्याची शक्यता वाढली आहे.
यावर्षीचा पावसाळा जूनपासून समाधानकारक राहिला. ऑगस्ट महिन्यातील दडी वगळता पावसाने यंदा चांगली साथ दिली आहे. दमदार पावसाच्या आगमनाने मागील तीन वर्षात प्रथमच जुलै महिन्यात नदी-नाले दुथडी भरुन वाहले. खरीप हंगामातील पिकेही जोमाने बाहेर निघाली. मूग, उडिदाचे उत्पादन चांगल्यापैकी असून, पावसाच्या दडीचा सोयाबीन पिकाला फटका बसला आहे. पावसाच्या दडीमुळे शेतकरी चिंताग्रस्त बनले होते. तर तालुक्यातील धरणातील जलसाठय़ाची वाढ थांबली होती.
मागील पंधरा दिवसाअगोदर तालुक्यातील मन प्रकल्पात ६७ टक्के जलसाठा होता. तर तोरणा प्रकल्पात ३८ टक्के, ढोरपगाव ८७ टक्के व ज्ञानगंगा प्रकल्पात ४४ टक्के जलसाठा होता. केवळ मस प्रकल्प ओव्हर फ्लो झाला होता. मात्र मागील आठवड्यात परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली. यामुळे आठवडाभरातच जलसाठय़ात अ पेक्षित वाढ झाली आहे. मन प्रकल्पात सद्यस्थितीत ८२ टक्के जलसाठा झाला आहे. या परिसरात आतापर्यंत ६३0 मि.मी. पावसाची नोंद आहे. तोरणा प्रकल्पात ६२५ मि.मी. पाऊस होऊन जलसाठा ४६.७८ टक्के आहे. ढोरपगाव प्रकल्प १00 टक्के भरला असून, सध्या या प्रकल्पातून ५ सेमी पाण्याचा विसर्ग सुरु आहे. खामगाव शहराला पाणी पुरवठा करण्याच्या ज्ञानगंगा प्रकल्पात घसघशीत वाढ होऊन जलसाठा ५८.0६ टक्के झाला आहे. या परिसरात आतापर्यंत तालुक्यात सर्वाधिक कमी ३३0 मि.मी. पावसाची नोंद आहे. लघुप्रकल्प बोरजवळामध्ये ५१.६0 टक्के, गारडगाव ८३.८३ टक्के, लांजुड ६८.२९ टक्के, पिंप्री गवळी ९७.१३ टक्के, तर टाकळी तलावात १00 टक्के साठा होऊन, यामधून २ से.मी. पाण्याचा विसर्ग सुरु आहे. परतीच्या पावसामुळे नदी-नाले पुन्हा दुथडी भरुन वाहू लागले असून, धरणामध्ये जलसाठा लवकरच वाढण्याची शक्य ता आहे.
ढोरपगाव मन प्रकल्पांतर्गत नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा
परतीच्या पावसामुळे तालुक्यातील जलसाठय़ात अपेक्षित वाढ होत आहे. शिर्ला नेमाने येथील मन प्रकल्पात सद्यस्थितीत ८२ टक्के जलसाठा झाला असून, परतीचा पाऊस सुरु राहिल्यास धोक्याची पाणीपातळी ओलांडली जाऊ शकते. त्यामुळे सुरक्षितता म्हणून मन नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा पाटबंधारे विभागाच्यावतीने देण्यात आला आहे. तसेच ढोरपगाव लघू प्रकल्प ओव्हर फ्लो होऊन, यामधून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. या प्रकल्पालगतही सतर्कतेचे इशारे देण्यात आले आहेत.
परतीच्या पावसामुळे तालुक्यातील प्रकल्पात अपेक्षित जलसाठा वाढत आहे. सुरक्षितता म्हणून मन प्रकल्प व ढोरपगाव लघू प्रकल्पांतर्गत येणार्या धोक्याच्या गावांना सतर्क तेचा इशारा देण्यात आला आहे. धरणातील वाढत्या जलसाठय़ावर विभाग लक्ष ठेवून आहे.
- पी.यू. सरदार
उपविभागीय अधिकारी
मन प्रकल्प उपविभाग, शिर्ला नेमाने