‘खडकपूर्णा’च्या जलसाठ्यात वाढ; १९ गावांना सतर्कतेचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 11:40 AM2020-07-24T11:40:07+5:302020-07-24T11:40:18+5:30
प्रकल्पामधील जलसाठ्यात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून ७०.१२ टक्के पाणीसाठा झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: जिल्ह्यातील मोठ्या तीन प्रकल्पांपैकी एक असलेल्या खडकपूर्णा प्रकल्पामधील जलसाठ्यात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून ७०.१२ टक्के पाणीसाठा झाला आहे. परिणामी नदीकाठच्या १९ गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
गेल्या सात वर्षात हा प्रकल्प तिसऱ्यांचा भरण्याची शक्यता त्यामुळे निर्माण झाली आहे. खडकपूर्णा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात तथा मराठवाड्याच्या पट्ट्यात दमदार पाऊस झाल्याने खडकपूर्णा प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. सप्टेंबर पुर्वीच प्रकल्पात ७० टक्के जलसाठा झाल्याने सतर्कता म्हणून हा इशारा देण्यात आला आहे.
या प्रकल्पाची साठवण क्षमता ९३.४० दलखमी आहे. पाणी पातळी ५२०.५० मिटरवर पोहोचल्यास प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरतो. सध्या प्रकल्पातील जलसाठ्याची पातळी ही ५१९.५० मिटरवर पोहोचली आहे. प्रकल्पात सध्या ६५.४९ दलघमी पाणीसाठा आहे.
दरम्यान, प्रकल्पामध्ये प्रसंगी आणखी पाण्याची आवक वाढल्यास कोणत्याही क्षणी प्रकल्पाचे दरवाजे उघडले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे खडकपूर्णा नदीला प्रसंगी मोठा पुर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
प्रकरणी नदीकाठच्या १९ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सतर्कतेचा इशारा देण्यात आलेल्या गावांमध्ये देऊळगाव राजा तालुक्यातील निमगांव गुरू, सावंगी टेकाळे, डिग्रस बु, डिग्रस खु, टाकरखेड वायाळ, टाकरखेड भागिले, सिंदखेड राजा तालुक्यातील निमगांव वायाळ, साठेगांव, हिवरखेड, राहेरी खु, तडेगांव, राहेरी बु, ताडशिवणी, देवखेड, पिंपळगांव कुंडा, लिंगा आणि लोणार तालुक्यातील खापरखेडा, रायगांव व सावरगांव तेली या गावांचा समावेश आहे. असल्याची माहिती खडकपूर्णा प्रकल्पाच्या सुत्रांनी दिली आहे. गेल्या वर्षीही हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला होता.