पर्यटन, धार्मिकस्थळांवर वाढली गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:44 AM2020-12-30T04:44:06+5:302020-12-30T04:44:06+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवेश बंद असताना सरोवराच्या पाण्याच्या रंग का व कसा बदलला? याच्या उत्सुकतेपोटी अनेक पर्यटक, नागरिकांनी सरोवर पाहण्यासाठी ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवेश बंद असताना सरोवराच्या पाण्याच्या रंग का व कसा बदलला? याच्या उत्सुकतेपोटी अनेक पर्यटक, नागरिकांनी सरोवर पाहण्यासाठी गर्दी केली होती. दरम्यान, प्रवेश बंद असल्याने नागरिकांचा हिरमोड झाला होता. तर काहींची इच्छा असून ते लोणारला येऊ शकले नाहीत. अशा अनेक पर्यटक, नागरिकांनी नाताळ दरम्यान आलेल्या सलग सुट्ट्यांचा फायदा घेत लोणार सरोवर पाहण्यासाठी पहिली पसंती दिल्याचे दिसून आले. दरम्यान, सरोवर परिसरात बिबट्याचा वावर असल्याने निसर्गप्रेमींनी त्याला मोबाइलच्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. मात्र बिबट्या दृष्टीस न पडल्याने पुन्हा सुट्टीदरम्यान लोणारलाच येऊ, असा निर्धार करून मार्गस्त झाले. सरोवर परिसरासह मोठा मारोती परिसरात विविध पक्ष्यांचे हिवाळ्यात आगमन होते. पर्यटनासह धार्मिकस्थळांवरही आता गर्दी वाढली आहे. लोणार सरोवर पर्यटनस्थळ पाहण्यासाठी पर्यटकांचा ओढा वाढत आहे. याकडे प्रशासन व शासनाने लक्ष देऊन पर्यटन व्यवसायाला चालना मिळण्यासाठी प्रोत्साहन दिल्यास शहरात रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात.
पर्यटकांमध्ये नाराजी
जागतिक पर्यटनस्थळ लोणार सरोवर पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना राहण्याची व्यवस्था लोणारला न झाल्याने काहींनी नाराजी व्यक्त केली. तसेच पर्यटनस्थळाकडे जाण्यासाठी मार्गदर्शक माहिती सोयीने उपलब्ध होत नसल्याने काही पर्यटकांचा वेळेचा अपव्यय होत आहे.
रेस्टारंट, व्यावसायिकांमध्ये आनंद
सलग सुट्या आल्याने पर्यटनस्थळे पर्यटकांच्या गर्दीने फुलली. नऊ महिन्यांपासून घरीच असल्याने या सुट्यांमुळे पर्यटक बाहेर पडले आहेत. शुक्रवार, शनिवार, रविवार सलग सुट्या असल्याने पर्यटकांनी लोणार सरोवर पाहण्यासाठी गर्दी केली होती. गेल्या नऊ महिन्यांनंतर ही पर्यटनस्थळे गर्दीने बहरल्याने पर्यटकांवर अवलंबून असलेले रेस्टारंट मालक तसेच छोटेमोठे विक्रेते आनंदी झाले. पर्यटकांची गर्दी वाढल्यामुळे काही प्रमाणात पुरातत्त्व विभागाच्या यत्रंणेवर ताण आला आहे.