स्कूल बसचालकांनी वाढविलेले भाडे , शाळांचा शुल्कासाठीही तगादा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 10:33 AM2021-02-07T10:33:16+5:302021-02-07T10:33:27+5:30
स्कूल बसचालकांनी वाढविलेले भाडे व शाळांनी शैक्षणिक शुल्कासाठी लावलेला तगादा यामुळे पालक आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : गेल्या नऊ महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा सुरू झाल्या असून, शहरातील शाळांत विद्यार्थ्यांची उपस्थिती हळूहळू वाढत आहे. मात्र, स्कूल बसचालकांनी वाढविलेले भाडे व शाळांनी शैक्षणिक शुल्कासाठी लावलेला तगादा यामुळे पालक आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
कोरोना महामारीमुळे गत नऊ महिन्यांपासून बंद असलेल्या पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा नुकत्याच सुरू झाल्या आहेत. ऑनलाइन शिक्षणाला कंटाळलेल्या विद्यार्थ्यांना शाळेत जाऊन शिकता येत आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे सर्वच क्षेत्रात मरगळ आली आहे.
अनेकांचे रोजगार कमी झाले असून, व्यापारावरही मोठा परिणाम झाला आहे. आर्थिक मंदीचा काळ सुरू असतानाच दुसरीकडे महागाईने कळस गाठला आहे.
अन्नधान्य, खाद्यतेल तसेच पेट्रोल, डिझेलचे दर वाढले आहेत. कोरोनानंतर महागाईचा सामना करणाऱ्या नागरिकांना आता आपल्या पाल्याच्या शिक्षणाची चिंता लागली आहे. शहरातील खासगी शाळेत शिकणाऱ्या पाल्यांचे शैक्षणिक शुल्क, तसेच स्कूल बसचे भाडे सर्वसामान्य नागरिकांना परवडणारे नाही. अशातच काही शाळांनी शैक्षणिक शुल्क पूर्ण भरण्यासाठी पालकांना सूचना दिल्या आहेत.
स्कूल बसचे शुल्क केले दुप्पट
विद्यार्थ्यांची शाळेला ने-आण करणाऱ्या स्कूल बसचालकांनी वाढत्या तेलाच्या किमती व मागील आठ, नऊ महिन्यांपासून वाहने बंद असल्याने बुडालेला रोजगार यामुळे स्कूल बसचालकांनी नेहमीच्या दरात वाढ केली आहे. एका विद्यार्थ्यासाठी ६०० रुपये शुल्क असताना आता एक हजार रुपये शुल्क स्कूल बसचालक मागत आहेत. त्यामुळे पाल्यांना शाळेत कसे पाठवायचे, असा प्रश्न पालकांना पडला आहे. त्यामुळे अनेक पालक पाल्यांना स्वतः शाळेत घेऊन जात आहेत.
पालकांचा विरोध
मात्र आठ, नऊ महिन्यांपासून शाळा बंद असतानाही वार्षिक शुल्क पूर्ण कसे द्यावे, संगणक, प्रशिक्षण, मैदान व इतर शाळेतील कोणत्याही गोष्टीचा वापर न करता केवळ ऑनलाइन शिक्षणासाठी पूर्ण शुल्क आकारले जात आहे. दरम्यान, एका खासगी शाळेतील पालकांनी आक्रमक भूमिका घेऊन पूर्ण शुल्क भरण्यास विरोध दर्शविला असल्याचे दिसून येत आहे.