नादुरुस्त बसमुळे वाढली प्रवाशांची डोकेदुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:38 AM2021-01-16T04:38:52+5:302021-01-16T04:38:52+5:30
मेहकर आगारात गेल्या अनेक वर्षांपासून १०३ बस आहेत. मात्र, या बसमध्ये आवश्यक असणाऱ्या साहित्याचा अभाव आहे. टायर स्टेपनी नसल्याने ...
मेहकर आगारात गेल्या अनेक वर्षांपासून १०३ बस आहेत. मात्र, या बसमध्ये आवश्यक असणाऱ्या साहित्याचा अभाव आहे. टायर स्टेपनी नसल्याने लांब पल्ल्यावर जाणाऱ्या बस रस्त्यात कोणत्याही ठिकाणी बंद पडतात. एकीकडे सर्वात जास्त उत्पन्न देणाऱ्या या आगाराची अत्यंत वाईट अवस्था झाली आहे. अनेक गाड्यांमध्ये कोणतेही वेळी बिघाड होत असल्यामुळे औरंगाबाद, जालना, नागपूर-अमरावती रस्त्यावर धावणाऱ्या बस चालकांना त्रास सहन करावा लागत आहे, अशी माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर काही बस चालकांनी दिली. आगारातील अनेक गाड्यांना मार्गाचे नामफलक दिसत नसल्याने कोणती बस कुठे जाते याबाबत प्रवाशांना समजत नाही. गेल्या अनेक वर्षांपासून या आगारात एकही नवीन बस न आल्याने या आगारात जुन्या भंगार अवस्थेत असलेल्या बसवरच महामंडळाचा डोलारा सुरू आहे. आगारातील बस रेसिंग होत नाहीत. गाड्यांचे ब्रेक व्यवस्थित लागत नाहीत. अनेक वेळा बसचालकाने तक्रार केल्यावरही कोणतीही दखल घेण्यात येत नसल्याने बसचालक त्रस्त झाले आहेत. आगारात प्रवाशांना महामंडळाकडून योग्य ती सुविधा मिळत नसल्याने खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. यासंदर्भात आगार व्यवस्थापकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.