आरोग्य यंत्रणेवर वाढला ताण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:33 AM2021-03-21T04:33:19+5:302021-03-21T04:33:19+5:30
अमडापूर : कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने आरोग्य कर्मचाऱ्यावरील ताण वाढला आहे. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्या मार्गी लावण्यात याव्या, ...
अमडापूर : कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने आरोग्य कर्मचाऱ्यावरील ताण वाढला आहे. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्या मार्गी लावण्यात याव्या, त्यांना महिन्याच्या १ तारखेला वेतन देण्यात यावे, यासह विविध मागण्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केल्या आहेत.
कोरोना विषाणूने पुन्हा पाय पसरविण्यास सुरुवात केली आहे. आरोग्य यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी स्वतःची व कुटुंबाची पर्वा न करता अहोरात्र काम करत आहेत. अत्यंत थोडक्या मनुष्यबळावरच सर्व कामे पार पाडत असताना कर्मचाऱ्यांकडून तारेवरची कसरत करून कामे घ्यावी लागत आहे. आरोग्य कर्मचारी व अधिकारी त्यांचे आरोग्य संवर्धन करणे अत्यंत आवश्यक आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांचे वेतन महिन्याच्या १ तारखेस देण्यात यावे, नियमित व एनएचएम कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचे कोविड केअर सेंटरकरिता संपूर्ण स्टफ एसएम नव्याने भरण्यात यावा, प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या ड्युटी लावण्यात येऊ नये, प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी एनएचएमअंतर्गत स्टाफ नर्स आणि एलएचव्ही पद तात्काळ भरण्यात यावे, लसीकरणाच्या ठिकाणी एएनएमची संख्या कमी आहे. त्या ठिकाणी १७ प्रमाणे रोजंदारीवर एनएमची नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी आरोग्य कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात आली. जिल्हाध्यक्ष अनिल लोखंडे यांच्यासह सर्व संघटना पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले आहे.