स्वॅब तपासणी प्रयाेगशाळेवर वाढला ताण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 11:38 AM2021-03-10T11:38:54+5:302021-03-10T11:38:54+5:30
Buldhana News प्रयाेग शाळेत दरराेज २५०० ते ३००० अहवाल तयार करण्यात येत आहेत. तसेच तीन शिफ्टमध्ये काम सुरू आहे.
- संदीप वानखडे
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : काेराेनाचा वाढता संसर्ग पाहता जिल्हाभरात चाचण्या वाढविण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. प्राथमिक आराेग्य केंद्र स्तरावर स्वॅब गाेळा करण्यात येत असल्याने बुलडाण्यातील स्वॅब तपासणी करणाऱ्या प्रयाेगशाळेवर माेठ्या प्रमाणात ताण वाढला आहे. प्रयाेग शाळेत दरराेज २५०० ते ३००० अहवाल तयार करण्यात येत आहेत. तसेच तीन शिफ्टमध्ये काम सुरू आहे.
गत काही दिवसांपासून जिल्ह्यात काेराेना रुग्णांची संख्या वाढतच आहेत. त्यातच प्रशासनाने दुकानदारांचीही काेराेना तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. पाॅझिटिव्ह आलेल्या रुग्णांच्या संपर्कातील लाेकांचीही काेराेना तपासणी करण्यात येत आहे. त्यामुळे, स्वॅब तपासणी करणाऱ्या बुलडाण्यातील प्रयाेगशाळेवर माेठ्या प्रमाणात ताण वाढला आहे. प्रयाेग शाळेची सर्वसामान्य स्थितीत १००० ते १५०० स्वॅब तपासणीची क्षमता आहे. तसेच आपत्कालीन परिस्थतीत सध्या प्रयाेगशाळेत २५०० ते ३००० नमुन्यांची तपासणी करून अहवाल देण्यात येत आहेत. स्वॅब घेण्यापासून ते प्रयाेगशाळेपर्यंत येण्यासाठी माेठी प्रक्रिया असल्याने चाचणींचे अहवाल येण्यास विलंब हाेत आहे. स्वॅब देणाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात येत नसल्याने ताे गावात फिरताे. त्यानंतर दाेन ते तीन दिवसांनी ताे पाॅझिटिव्ह असल्याचे समाेर येत आहे. त्यामुळे काेराेना रुग्ण वाढतच आहेत.