जिल्ह्यात वाढतेय लसीकरणाची व्याप्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 08:37 AM2021-02-05T08:37:34+5:302021-02-05T08:37:34+5:30
बुलडाणा : जिल्ह्यात आतापर्यंत सात केंद्रांवर कोविड लसीकरण सुरू होते. आता लसीकरणाची व्याप्ती वाढत आहे. पुन्हा नव्याने तीन केंद्रांमध्ये ...
बुलडाणा : जिल्ह्यात आतापर्यंत सात केंद्रांवर कोविड लसीकरण सुरू होते. आता लसीकरणाची व्याप्ती वाढत आहे. पुन्हा नव्याने तीन केंद्रांमध्ये २५ जानेवारीपासून लसीकरण सुरू करण्यात आले असून, एकूण १० केंद्रांवर आता लसीकरण होत आहे. लस घेतलेला प्रत्येकजण सुरक्षित आहे. दिवसाला नियोजन केलेल्यांपैकी ८० टक्के लोकांना सध्या लस दिली जात आहे. जिल्ह्यामध्ये कोविड लसीचे लसीकरण टप्प्याटप्प्याने वाढवण्यात येत आहे. या लसीकरण मोहिमेत नोंदणीकृत लाभार्थींना लस देण्यात येत आहे. कोविड १९ विषाणूचा नायनाट करणे हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून आरोग्य विभागाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. जिल्ह्यात १६ जानेवारीपासून सहा लसीकरण केंद्रांवर लसीकरणास सुरुवात झाली होती. या मोहिमेला २६ जानेवारीला १० दिवस होत आहेत. दहा दिवसात चार केंद्र लसीकरणासाठी वाढविण्यात आले आहेत. २५ जानेवारीपासून एकूण १० केंद्रांवर लसीकरण करण्यात येत आहे. यापूर्वी जिल्ह्यात जिल्हा सामान्य रुग्णालय, बुलडाणा, सामान्य रुग्णालय, खामगाव, ग्रामीण रुग्णालय, देऊळगाव राजा, उपजिल्हा रुग्णालय, मलकापूर, शेगाव व चिखली याठिकाणी लसीकरण सुरू होते. दरम्यान, २५ जानेवारीला लोणार, नांदुरा व संग्रामपूर या तीन ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. परंतु अद्यापही काही नोंदणीकृत लाभार्थींमध्ये लस घेण्याची भीती वाटत आहे. त्यामुळे लसीकरणासाठी नोंदणी केल्यानंतरही ते लस घेण्यासाठी येत नाहीत. परंतु असे लाभार्थी अगदी बोटावर मोजण्याइतकेच आहेत. अगोदर तुम्ही घ्या, नंतर आम्ही घेतो, असे म्हणणारेसुद्धा केंद्रावर आल्यानंतर पहावयास मिळतात. परंतु लसीकरणानंतर सर्वजण सुरक्षित असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
एका केंद्रावर १०० जणांना लसीचे नियोजन
सध्या काेविड लसीकरणाच्या एका केंद्रावर दिवसाला १०० जणांना लस देण्याचे नियोजन आहे. त्यापैकी ८० ते ९० लाभार्थींना लसीकरण करण्यात येत आहे. जिल्ह्यामध्ये एकूण ६४६ आरोग्य संस्थांमध्ये १३ हजार ९६० डॉक्टर व आरोग्यसेविका, आरोग्य कर्मचारी यांना पहिल्या फेरीमध्ये लसीकरण करण्यात येत आहे.
जिल्ह्यात आजपासून दहा लसीकरण केंद्रावर कोविड लस देणे सुरू केले आहे. लस घेतलेल्यांना रिॲक्शन नाही. केंद्रावर सर्व उपचाराची सुविधा सज्ज आहे.
डॉ. बाळकृष्ण कांबळे, जिल्हा आरोग्य अधिकारी.