बुलढाणा जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारंसघांत स्वतंत्र उमेदवार; रविकांत तुपकर यांची घोषणा
By निलेश जोशी | Published: July 7, 2024 12:40 AM2024-07-07T00:40:11+5:302024-07-07T00:40:30+5:30
तुपकरांनी यावेळी सर्वांची मते जाणून घेत बुलढाणा, चिखली, सिंदखेड राजा, मेहकर, खामगाव, जळगाव जामोद आदी सहा विधानसभा मतदारसंघात उमेदवार उभे करणार असल्याचे स्पष्ट केले.
बुलढाणा: लोकसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून घेतलेली मते पाहता शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी बुलढाणा लोकसभा मतदारसंघातंर्गत येत असलेल्या सहाही विधानसभा मतदारसंघात स्वतंत्र उमेदवार उभे करण्याचा निर्णय ६ जुलै रोजी घेतला आहे. चिखली रोडवरील एका सभागृहात झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत त्यांनी ही घोषणा केली.
लोकसभा निवडणुकीत शेतकऱ्यांची ताकद दिसून आल्याचे सांगत कार्यकर्त्यांनी, रविकांत तुपकर यांनीही विधानसभा निवडणूक लढवावी, असा आग्रह धरला. तुपकरांनीही यावेळी सर्वांची मते जाणून घेत बुलढाणा, चिखली, सिंदखेड राजा, मेहकर, खामगाव, जळगाव जामोद आदी सहा विधानसभा मतदारसंघात उमेदवार उभे करणार असल्याचे स्पष्ट केले. या सर्व मतदारसंघातील उमेदवार हे शेतकऱ्यांचे रहातील असे तुपकर म्हणाले. दरम्यान, ते स्वत: विधानसभा निवडणूक लढविणार आहेत का, याबाबतची भूमिका मात्र, त्यांनी स्पष्ट केली नाही. याशिवाय राज्यपातळीवरील निर्णय पुण्यातील बैठकीत घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
--राज्यव्यापी आंदोलन उभारणार--
सोयाबीन-कापूस, पिकविमा, नुकसान भरपाई, वन्य प्राण्यांचा होणारा त्रास पहाता या प्रश्नी राज्यव्यापी आंदोलन उभे करणार असल्याचे तुपकर म्हणाले. गेल्या काही वर्षांपासून सोयाबीन-कापूस, पिकविमा व नुकसान भरपाईसाठी ते लढा ते आहे. त्यात काही प्रमाणात यश आले असून, आता राज्यव्यापी आंदोलन उभारण्याचे संकेत त्यांनी दिली.