तूर नोंदणी, टोकनसाठी चिखली बाजार समितीत स्वतंत्र कक्ष
By admin | Published: May 20, 2017 12:22 AM2017-05-20T00:22:34+5:302017-05-20T00:22:34+5:30
चिखली: चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी तूर नोंदणी व टोकणसाठी स्वतंत्र कक्ष सुरू केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली: सरकारने तूर खरेदीसाठी ३१ मेपर्यंत मुदतवाढ दिली आहे; मात्र पावसाचा फटका बसून यार्डातील तुरीचे नुकसान होऊ नये यासाठी पूर्व नियोजन म्हणून चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी तूर नोंदणी व टोकणसाठी स्वतंत्र कक्ष सुरू केला आहे. या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन बाजार समितीचे सभापती डॉ. सत्येंद्र भुसारी यांनी केले आहे.
चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीच्यो १३ काट्यांवर २२ एप्रिल पर्यंत आलेल्या सर्व तुरीची खरेदी जवळपास आटोपली आहे. दरम्यान, सरकारने तूर खरेदीस ३१ मेपर्यंत मुदतवाढ दिली असल्याने या मुदतवाढीचा फायदा शेतकऱ्यांना व्हावा तसेच तुरीला मोसमी पावसाचा फटका बसून नुकसान होऊ नये यासाठी पूर्व नियोजन म्हणून बाजार समितीने तूर नोंदणी व टोकणसाठी स्वतंत्र कक्ष सुरू केला आहे. शेतकऱ्यांनी या सुविधेचा लाभ घेण्यासाठी आपल्या नावाची नोंदणी मुख्य कार्यालयात करावी, नोंदणीनुसार यार्डवर प्रथम येणाऱ्या शेतकऱ्यांस टोकन देण्यात येऊन तुरीचे मोजमाप केले जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय टळणार आहे. या केंद्रावर आतापर्यंत २ हजार १०० शेतकऱ्यांनी नोंद केली असून, आणखी ४० हजार क्विंटलची आवक अपेक्षित असल्याने अतिरिक्त वजनकाटे वाढविण्यात आले आहेत. बारदाना उपलब्ध झाल्यास दररोज १५०० क्विंटलपेक्षा जास्त वजनमाप होणार आहे व त्यानुसार शेतकऱ्यांना समितीकडून फोनद्वारे कळविण्यात येणार आहे. तसेच यार्डातील सूचना फलकावरही संभाव्य यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तर बाजार हस्तक्षेप योजना सनियंत्रण समितीचे अध्यक्ष तहसीलदार मनीष गायकवाड, सचिव संदीप रुद्राक्ष, बाजार समितीचे सचिव अजय मिरकड या त्रिसदस्यीय समितीचीही देखरेख राहणार असल्याने या सुविधेचा तालुक्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती डॉ. भुसारी यांनी केले आहे.
तुरीची तातडीने खरेदी करा : स्वाभिमानी संघटना
शासनाने तूर खरेदीस ३१ मे पर्यंत मुदतवाढ दिल्यानंतर शेतकऱ्यांकडील ४० हजार क्विंटल तुरीची नोंद बाजार समितीकडे झालेली आहे; मात्र असे असताना चिखली केंद्रावर तूर खरेदी बंद असल्याने नोंद झालेल्या शेतकऱ्यांची तूर तत्काळ खरेदी करण्यात यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष विनायक सरनाईक यांनी सनियंत्रण समितीचे अध्यक्ष तहसीलदार मनीष गायकवाड यांच्याकडे १९ रोजी केली आहे. यावेळी बाजार समितीचे सचिव मिरकड, सभापती डॉ. सत्येंद्र भुसारी, सहायक निबंधक रूद्राक्ष, स्वाभिमानीचे दीपक सुरडकर, भारत वाघमारे, भरत जोगदंडे आदी उपस्थित होते.