जागतिक विज्ञानाचा पाया भारतानेच रचला - जयंत सहस्त्रबुद्धे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 04:20 PM2019-07-14T16:20:30+5:302019-07-14T16:20:58+5:30
‘विज्ञान भारती’चे अखिल भारतीय संघटन मंत्री जयंत सहस्त्रबुद्धे यांच्याशी साधलेला संवाद...
अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: प्राचीन काळापासून भारतीय सर्वच क्षेत्रात अग्रेसर आहेत. योग, अध्यात्म, गणित आणि विज्ञानाचाही पाया भारतीयांनीच रचला आहे. जागतिक विज्ञानात भारताची मोठी देणगी आहे. भारतातील आधुनिक तंत्रज्ञानाची व प्राचीन विज्ञानाची लोकप्रियता वाढविणे हाच ‘विज्ञान भारती’चा मुख्य उद्देश आहे. देशी आंदोलन म्हणूनही ‘विज्ञान भारती’ची वेगळी ओळख आहे. ‘विज्ञान भारती’चे अखिल भारतीय संघटन मंत्री जयंत सहस्त्रबुद्धे यांच्याशी साधलेला संवाद...
भारतीय विज्ञानासमोरील आव्हाने कोणती?
आजच्या स्थितीत जे विज्ञान आपल्याला दिसतेय ते पाश्चिमात्य विज्ञानाचे प्रतिबिंब आहे. यामुळे एक आभासी चित्र निर्माण झाले असून, आजचे विज्ञान हे संपूर्ण आयात केलेले विज्ञान आहे. यामुळे भारतीय युवकाच्या मनात अशी भावना निर्माण झाली आहे की, भारतामध्ये जणू कधी विज्ञान नव्हतेच. स्वकीय विज्ञानाबद्दल भारतीयांमध्ये आस्था निर्माण करणे आणि भारतीय विज्ञानाचा अभिमान वाटावा ही भावना निर्माण करणे, हे मुख्य आव्हान भारतीय विज्ञानासमोरील आहे.
जागतिक विज्ञान क्षेत्रात भारताचे स्थान काय?
नासासारख्या प्रतिष्ठित विज्ञान संस्थेमध्ये भारतीय वैज्ञानिकांची संख्या उल्लेखनीय आहे. डॉ. होमी भाभा, डॉ. बोस, डॉ. सी. व्ही. रमन, डॉ. एपीजे अब्दुल कलाम, जयंत नारळीकर अशी एका पाठोपाठा एक अनेक नावे जागतिक स्तरावर भारतीय वैज्ञानिकांची सांगता येतील; परंतु हे केवळ हिमनगाचे एक टोक आहे. व्यापक दृष्टीने बघायचे झाल्यास आज वैश्विक स्तरावर संगणक क्षेत्रामध्ये जी ‘बायनरी कोड’ लँग्वेज वापरली जाते. ही जागतिक विज्ञानाला भारताची मोठी देणगी आहे.
‘विज्ञान भारती’ची स्थापना कधी झाली?
विज्ञान भारती ही देशातील एक अशासकीय संस्था आहे. ‘विज्ञान भारती’ची स्थापना जबलपूर येथे सन १९९१-९२ साली करण्यात आली आहे. प्रा. के. वासू यांच्या नेतृत्वात स्थापन झालेली विज्ञान भारती ही संस्था प्राचीन आणि देशी विज्ञानाची एक गतिशील चळवळ म्हणून झपाट्याने पुढे येत आहे. खामगावातदेखील विज्ञान भारती संलग्नीत नागार्जुन विज्ञान व पर्यावरण मंच डॉ. दीपक नागरिक यांच्या नेतृत्वात कार्यान्वित करण्यात आला आहे.