कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाईचे संकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:36 AM2021-04-02T04:36:05+5:302021-04-02T04:36:05+5:30
डोणगाव येथे प्रशासनाची संयुक्त बैठक लोकमत न्यूज नेटवर्क डोणगाव : कोरोना विषाणू संसर्गाचा उद्रेक होत असतानाही, डोणगाव येथे कोविड ...
डोणगाव येथे प्रशासनाची संयुक्त बैठक
लोकमत न्यूज नेटवर्क
डोणगाव : कोरोना विषाणू संसर्गाचा उद्रेक होत असतानाही, डोणगाव येथे कोविड आपत्ती व्यवस्थापन नियमांना बगल दिली जात असल्याचे वास्तव ‘लोकमत’ने समोर आणले. त्यानंतर प्रशासनाने संयुक्त बैठक घेत कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचे संकेत दिले आहेत.
डोणगाव येथे कोरोना नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याची बातमी ‘लोकमत’मध्ये प्रसिध्द होताच, एक एप्रिलला प्रशासनाने संयुक्त बैठक घेऊन कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर व मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाला दिले. या बैठकीत उपविभागीय महसूल अधिकारी गणेश राठोड, तहसीलदार डॉ. संजय गरकल, गटविकास अधिकारी आशिष पवार, बुलडाणा जिल्हा परिषदेचे कृषी सभापती राजेंद्र पळसकर व मेहकर पंचायत समितीचे सभापती निंबाभाऊ पांडव, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. महेंद्र सरपाते, वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल गवई, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी राठोड, विस्तार अधिकारी संदीप मेटांगळे, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेश सावजी, शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र आखाडे, अबरार खान, मंडल अधिकारी आर. पी. रहाटे आदी उपस्थित होते. यावेळी कोरोना लसीकरण वाढविण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्न करीत असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. महेंद्र सरपाते यांनी सांगितले, तर तहसीलदार डॉ. गरकल यांनी डोणगांव येथे कोरोना लसीकरण फक्त ३८ टक्के झाले असून, याचा वेग वाढविणे व लोकांना लसीकरण करून घेण्यासाठी लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना आदींनी जनजागृती करून लसीकरण करून घेणे आवश्यक आहे, असे सांगितले. उपविभागीय अधिकारी गणेश राठोड यांनी तालुक्यातील संपूर्ण गावामध्ये ९५ हजार कोरोना लसीकरण होणे आवश्यक असताना केवळ १० हजार लसीकरण झाले. त्यामुळे सर्वांनी कोरोनाविषयी जनजागृती करून जनतेच्या मनातील नकारात्मक काढून त्यांना लसीकरणाचे फायदे सांगून त्वरित लसीकरण करून घेणे कोरोनाला आळा घालण्यासाठी आवश्यक आहे, तर सोशल मीडियावर कोरोना लसीकरणाबाबत नकारात्मक भावना फैलावणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले. ५० पेक्षा जास्त व्यक्ती लग्नात असल्यास त्वरित कारवाई करून गावात किती लग्न झाली व लोक किती होते, याची नोंद ठेवण्याचेही त्यांनी स्थानिक कर्मचारी यांना सांगितले. डोणगावमध्ये कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर व मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, असेही त्यांनी सांगितले. यावेळी परिसरातील ग्रामसेवक, तलाठी, आशावर्कर, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी, महसूल मित्र उपस्थित होते.