इंडो-नेपाळ चॅम्पियनशिप स्पर्धेत बुलडाण्याची ‘एंट्री’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2020 12:40 PM2020-01-07T12:40:46+5:302020-01-07T12:41:13+5:30
शहरातील धर्मवीर आखाड्याच्या तालमीतील १० खेळाडूंची इंडो-नेपाळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यामध्ये कबड्डी स्पर्धेत ७ तर थाळीफेक, गोळाफेक व रनिंगमध्ये प्रत्येकी एक खेळाडू सहभागी होणार आहे.
- सोहम घाडगे
बुलडाणा : इंडो-नेपाळ चॅम्पियनशिप २०२० स्पर्धा २० ते २३ जानेवारीदरम्यान नेपाळमधील पोखरा शहरात होणार आहे. या स्पर्धेसाठी कबड्डी व अॅथलेटिक्स प्रकारात जिल्ह्यातील १० खेळाडूंची निवड झाली आहे. खेळाडूंच्या निवडीमुळे आंतरराष्ट्रीय स्पर्धेत बुलडाण्याची दमदार एंट्री पाहायला मिळणार आहे.
आरोग्यासाठी मैदानी खेळ महत्त्वाचे आहेत. मुलांनी किमान एक तरी मैदानी खेळ खेळला पाहिजे याकडे पालकांनी लक्ष देण्याची गरज आहे. शाळांनीही अभ्यासासोबतच खेळांकडेही ध्यान दिले पाहिजे. मुलांना शालेय शिक्षण मिळालेच पाहिजे यात शंका नाही; मात्र बहुतांश वेळा आपण अभ्यासापुढे खेळाला महत्त्व देत नाही. खेळामधून मुले वागणे, बोलणे शिकत असतात, हे आपण विसरून जातो. मुलांच्या जडणघडणीत खेळाची भूमिका महत्त्वाची असते. बुलडाण्यात सुरुवातीपासून खेळासाठी पोषक वातावरण आहे. जिल्ह्यातील अनेक खेळाडूंनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत नावलौकिक मिळविला आहे. शहरातील धर्मवीर आखाड्याच्या तालमीतील १० खेळाडूंची इंडो-नेपाळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यामध्ये कबड्डी स्पर्धेत ७ तर थाळीफेक, गोळाफेक व रनिंगमध्ये प्रत्येकी एक खेळाडू सहभागी होणार आहे. त्यामुळे जिल्ह्याची मान आणखीच उंचावली आहे. नेपाळमधील इंडो-नेपाळ चॅम्पियनशिप स्पर्धेनंतर एप्रिल महिन्यात थायलंडमध्ये स्पर्धा होणार आहेत. साधारण मार्च महिन्यात हरियाणात या स्पर्धेसाठी शिबिर होणार असल्याची माहिती मिळाली.
निवड झालेले खेळाडू
इंडो-नेपाळ स्पर्धेत कबड्डी खेळात राजवर्धन कोळी, तिलक तोंडीलायत, गणेश वायाळ, पवन चौबे, सौरभ चौबे वेगवेगळ्या वयोगटात व योगेश उगले खुल्या गटात सहभागी होणार आहेत, तर चेतन सांबरे गोळाफेक, महेश जाधव, सतीश उगले रनिंग व ऋषिकेश महाजन थाळीफेकमध्ये आपले कौशल्य दाखविणार आहे. कोल्हापूर येथे राज्यस्तर व गोवा येथे झालेल्या राष्ट्रीय स्तर स्पर्धेतून या खेळाडूंची नेपाळमधील आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
खेळात प्रसंगावधान, डावपेच महत्त्वाचे आहेत. धर्मवीर आखाड्यात खेळाडूंना उत्तम सुविधा दिल्या जातात. दरररोज सायंकाळी त्यांचे वर्कआउट घेण्यात येते. कौशल्य विकसित करण्यावर भर दिल्या जातो. इंडो- नेपाळ स्पर्धेत खेळाडू नक्कीच यश मिळवतील.
- मो. इद्रिस मो. अय्युब मकरानी
प्रशिक्षक, धर्मवीर कबड्डी संघ