उद्योगांचा सीएसआरचा दीड हजार कोटींचा निधी दुष्काळ निवारणासाठी वापरा - राजू शेट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2018 06:09 PM2018-12-09T18:09:57+5:302018-12-09T18:11:02+5:30
कॉर्पाेरेट सेक्टरकडील दीड हजार कोटी रुपयांचा कॉर्पाेरेट सोशल रिस्पॉन्सीबिलीटी निधी (सीएसआर) दुष्काळ निवारणावर खर्च करण्यासाठी आदेश काढण्याची मागणी स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा खा. राजू शेट्टी यांनी बुलडाणा येथे केली.
बुलडाणा: राज्यातील दुष्काळाची व्याप्ती पाहता शेतकर्यांसह सर्वसामान्य नागरिकांना दुष्काळी सुविधा देण्यासाठी राज्यात उद्योग व मुख्य कार्यालये असलेल्या कॉर्पाेरेट सेक्टरकडील दीड हजार कोटी रुपयांचा कॉर्पाेरेट सोशल रिस्पॉन्सीबिलीटी निधी (सीएसआर) दुष्काळ निवारणावर खर्च करण्यासाठी आदेश काढण्याची मागणी स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा खा. राजू शेट्टी यांनी बुलडाणा येथे केली. दरम्यान, भाजप वगळता अन्य पक्षांचे राज्यात महाआघाडी होऊ पाहत आहे. संपूर्ण शेतकरी कर्जमुक्ती आणि दीडपट हमी भावाचा मुद्दा जाहीरनाम्यात समाविष्ट केल्यास या महाआघाडीमध्ये समाविष्ठ होऊ अन्यथा आठ जागांवर स्वतंत्रपणे लढण्याचा आमचा पर्याय खुला असल्याचेही त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केले. स्वाभीमीन शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारीणीची बैठक नऊ डिसेंबर रोजी बुलडाण्यात झाली. त्यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, प्रकाश पोफळे, माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते, रसिका ढगे, सत्तारभाई पटेल, रवी पडोळे, एकनाथराव दुधे, मयुर बोर्डे, दामोधर इंगोले, देवेंद्र भोयर, मानिकराव कदम प्रामुख्याने, राणा चंदन प्रामुख्याने उपस्थित होते. कायद्यानुसार सीएसआर निधी कॉर्पाेरेट जगताला खर्च करणे अनिवार्य आहे. त्यांच्याच सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून तो खर्च केला जातो. मात्र राज्यातील १५६ तालुक्यातील दुष्काळ पाहता हा निधी दुष्काळ निवारणासाठी खर्च केला जावा, अशी मागणी त्यांनी केली. दुष्काळ जाहीर करण्यात आला असला तरी उपाययोजना हाती घेतल्या गेलेल्या नाहीत. शेतकर्यांची वीज तोडणे सुरू आहे, शेती कर्जाचे पूनर्गठन नाही, जळालेली वीज रोहीत्रे पुन्हा नव्याने लावल्या जात नाही, चार्याची भीषण टंचाई निर्माण होण्याची शक्यता पाहता दावणीला चारा उपलब्ध केल्या जावा, त्यासाठी शेतकर्यांशी करार करून ज्या भागात पाणी उपलब्ध आहे तेथे त्याचे नियोजनही राज्य सरकारने केले नसल्याचे ते म्हणाले. ३२ लाख शेतकर्यांनी पीक विमा भरला आहे. त्यांना नियमानुसार दुष्काळी परिस्थिती पाहता २५ टक्क्यांचा पहिला हप्ता दिला जावा, यासह अन्य मागणयांसाठी १७ डिसेंबरला तालुकास्तरावर, २५ डिसेंबरला जिल्हास्तरावर आंदोलन करण्यात येईल तर जानेवारी महिन्यात औरंगाबाद आणि नागपूर येथे मोर्चे काढण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
वर्धा, बुलडाणा लोकसभा प्रतिष्ठेची
होऊ घातलेल्या महाघाडीच्या समान कार्यक्रमामध्ये संपूर्ण शेतकरी कर्जमुक्ती आणि दीडपट हमीभाव या दोन गोष्टींचा जाहीरनाम्यात समावेश न केल्यास लोकसभेत स्वतंत्रपणे लढण्याचा पर्याय खुला असल्याचे खा. राजू शेट्टी यांनी सांगितले. पश्चिम महाराष्ट्रात हातकणंगले, कोल्हापूर, सांगली, धुळे, लातूर, वर्धा आणि बुलडाणा येथे लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने आमची तयारी झाली आहे. समान कार्यक्रमातंर्गत आमच्या दोन्ही मागण्यांचा जाहिर नाम्यात समावेश केल्यास वर्धा आणि बुलडाणा लोकसभेच्या जागा आमच्यासाठी अधिक प्रतिष्ठेच्या राहतील, असेही ते म्हणाले. दरम्यान, भाजपने दीडपट हमीभाव आणि शेतकर्यांची संपूर्ण कर्जमुक्ती केल्यास प्रसंगी त्यांचा पर्यायही ही आमच्यासाठी खुला आहे. केवळ राजकराण हा आमचा स्थायी भाव नसून शेतकरी हिताला आम्ही प्राधान्य देणारे आहेत, असे यासंदर्भात विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले.