कपाशीवर मावा तर सोयाबीनवर चक्रिभुग्यांचे आक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:20 AM2021-07-24T04:20:46+5:302021-07-24T04:20:46+5:30

साखरखेर्डा : सिंदखेडराजा तालुक्यात सोयाबीनसह कपाशी, मूग, उडीद, संकरित ज्वारी, तीळ, तूर या पिकाची परिस्थिती चांगली असताना सोयाबीनवर ...

Infestation of aphids on cotton and soybeans | कपाशीवर मावा तर सोयाबीनवर चक्रिभुग्यांचे आक्रमण

कपाशीवर मावा तर सोयाबीनवर चक्रिभुग्यांचे आक्रमण

Next

साखरखेर्डा : सिंदखेडराजा तालुक्यात सोयाबीनसह कपाशी, मूग, उडीद, संकरित ज्वारी, तीळ, तूर या पिकाची परिस्थिती चांगली असताना सोयाबीनवर चक्रिभुंग्याचा प्रादुर्भाव जाणवू लागला आहे़ तसेच कपाशीवर मवा पडल्याने पानातील रस शोषून घेऊन कपाशीची वाढ खुंटली आहे़ पिकांची परिस्थिती समाधानकारक असली तरी राेगराईमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

तालुक्यातील सोयाबीन पिकाचे लागवड क्षेत्रफळ हे ३३ हजार १०० हेक्टर असून त्या खालोखाल कपाशीचे क्षेत्रफळ २४ हजार ३०० हेक्टर आहे. मूग ५००, उडीद ५००, संकरित ज्वारी ३००, तूर १२०० तर इतर पिकाची ५०० हेक्टरवर खरिपाची पेरणी झालेली आहे. यावर्षी जून महिन्यात १८२ : ०६ मि मी तर जुलै महिन्यात २१४:०१ मिमी पाऊस पडल्याने पिकांची उगवण क्षमता समाधानकारक आहे. २१ जुलैपर्यंत तालुक्यात ३९२:०५ मि मी पावसाची नोंद झाली आहे. त्यात साखरखेर्डा मंडळात ६७३.०० मिमी, शेंदुर्जन मंडळात ५८८ मिमी., मलकापूर पांग्रा मंडळात ३३९ मिमी, सोनोशी मंडळात ४९३ मिमी, दुसरबीड मंडळात ४६५ मिमी, किनगाव राजा मंडळात ४०८ मिमी, सिंदखेडराजा मंडळात ५५२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यातील साखरखेर्डा येथील महालक्ष्मी तलाव ९० टक्के भरला असून, हनवतखेड, हिवरा गडलिंग येथील तलावही ८० टक्के भरले आहेत. मांडवा आणि केशवशिवणी धरण ६० टक्के भरले आहे़

विद्रुपात ५० टक्के जलसाठा

सिंदखेडराजा तालुक्यातील बुट्टातांडा गावाजवळ विदर्भ आणि मराठवाडा सीमेवर विंद्रुपा हे मोठे धरण असून या प्रकल्पात ५० टक्के पाणी साठा आहे. सिंदखेडराजा येथील मोती तलाव आणि चांदणी तलावात ५० टक्के ऐवढेच पाणी आहे. सर्वात कमी पाऊस हा मलकापूर पांग्रा मंडळात असून सर्वात जास्त पाऊस साखरखेर्डा मंडळात झालेला आहे. तालुक्यातील पिकांची परिस्थिती समाधानकारक असली तरी सोयाबीनची उगवण क्षमता चांगली असताना चक्रीभुग्यांचा प्रादुर्भाव जाणवल्याने वाढलेल्या पिकात जाऊन शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून फवारणी करावी लागत आहे.

मवा पडल्याने पाती गळती

जांभोरा, सोनोशी, चांगेफळ भागात कपाशीची लागवड ही उन्हाळ्यात होते. परंतु मवा पडल्याने पाणातील रस शोषून घेऊन पाती गळत आहेत. त्यात सोनोशी मंडळात आठ दिवसांपासून पाऊस पडला नसल्याने मवाचे संक्रमण वाढत आहे. फवारणीचा खर्चही वाढतो आहे. कपाशीची वाढ समाधानकारक असली तरी या मवा किडीने चिंता वाढली आहे. मूग आणि उडिदाची पेरणी कमी क्षेत्रात असली तरी येत्या पोळ्याच्या सणाला मूग शेतकऱ्यांच्या घरात येणार आहे़

सोयाबीन पिकाची दुबार, तिबार पेरणी झाली असली तरी पिकांची परिस्थिती समाधान कारक आहे. मुगाला फुले लागली आहेत.

शिवाजी रिंढे, शेतकरी मोहाडी

कपाशीची आधुनिक लागवड केली आहे. फूल धारणेत असतानाच मंवा कीड पडल्याने पाण्यातील रस शोषून घेत आहे.

प्रल्हाद खरात, प्रगतशील कास्तकार

Web Title: Infestation of aphids on cotton and soybeans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.