खामगाव येथील शासकीय कार्यालयांमध्ये कोरोनाचा शिरकाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2020 11:05 AM2020-08-23T11:05:58+5:302020-08-23T11:06:25+5:30
शासकीय कार्यालयांमध्येही कोरोनाचा शिरकाव झाल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : शहरातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये कोरोना विषाणू पॉझिटिव्ह रूग्ण निघाल्याने त्या कार्यालयांचे कामकाज प्रभावित झाले. दरम्यान, त्या रूग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह येत असल्याने ती कार्यालये पुन्हा सुरू होत आहेत. शासकीय कार्यालयांमध्ये वाढत असलेल्या प्रादुर्भावाने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
गेल्या काही दिवसांत खामगाव शहरातील शासकीय कार्यालयांमध्ये कार्यरत कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामध्ये विविध कार्यालयांचा समावेश आहे. त्या कर्मचाऱ्याच्या संपर्कात आलेल्यांचे स्वॅब तपासणी करण्यात आले. ते सर्व निगेटिव्ह आले. त्यामुळे खामगाव पंचायत समिती कार्यालय तात्पुरते एका दिवसासाठी बंद ठेवण्यात आले. शुक्रवारी पुन्हा कामकाजाला नियमितपणे सुरूवात झाली. तर खामगाव-शेगाव तालुका कर्मचारी सहकारी पतसंस्थेतील कर्मचारीही पॉझिटिव्ह निघाला. त्यामुळे त्या पतसंस्थेचे कामकाज सात दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला. दरम्यान, शनिवारी खामगावात १४ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. त्यामध्ये पोलिस क्वार्टर परिसर, तर उर्वरित कन्ही, सवडत, निमकव्हळा येथील रहिवासी असल्याची माहिती आहे.
गत काही दिवसांपासून शासकीय कार्यालयांमध्येही कोरोनाचा शिरकाव झाल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. तसेच खामगाव शहरात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याचे चित्र आहे.