नुकसानाची दाहकता वाढली, गावोगावी पीक मोडण्यावर भर
By विवेक चांदुरकर | Published: December 14, 2023 03:30 PM2023-12-14T15:30:52+5:302023-12-14T15:31:09+5:30
एकलारा बानोदा, काकनवाडा बुद्रुक बावनबीर येथील शेतकऱ्यांनी मोडले पीक
एकलारा बानोदा : अवकाळीचा तडाखा व त्यानंतर कटवर्म किडींचा वाढलेल्या प्रादुर्भावामुळे हरभरा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे हजारो रूपये खर्च करून पेरणी केलेले पीक गावोगाचे शेतकरी मोडत आहेत. शेतकर्यांचा हजारो रूपयांचा खर्च व परिश्रम व्यर`थ जात आहे.
एकालारा बानोदासह संग्रामपुर तालुक्यातील शेतकर्यांना रब्बीतील हरबरा पिकावर रोटाव्हेटर फिरवावा लागत आहे. एकलारा बानोदा येथील नितीन देशमुख, काकनवाडा बुद्रुक येथील अमोल रावणकार, बावनबीर येथील राहुल मनसुटे या शेतकर्यांनी हरभरा पीक मोडले आहे.
आधिच दुष्काळ त्यात दुबार पेरणी करावी लागणार असल्याने बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. अवकाळी पाऊस व धुके पडल्याने बुरशीजन्य रोग हरबरा पिकावर आला आहे. हरभरा पिक जळत आहे. खरिपात अतिवृष्टी झाली. त्यानंतर पावसाचा खंड पडला. त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दुष्काळात बळीराजा भरडला गेला. त्यातुन सावरत उधार, उसणवारी करत रब्बीतील हरबरा पिकाची पेरणी केली. पिक जोमदार दिसत असतांनाच अवकाळी पाऊस सुरु झाला. या पावसानंतर पिकावर बूरशीजन्य रोगाने हल्ला करत पिक उध्वस्त केले. त्यामुळे हताश शेतकर्यांनी रोटाव्हेटर फिरवून पीक नष्ट करण्याचा निर्णय घेतला. आता दुबार पेरणीचे संकट शेतकर्यांपुढे उभे आहे.
मी माझ्या शेतामध्ये हरभरा पिकाची लागवड केली होती. परंतु अवकाळी पाऊस व बुरशीजन्य रोग, अळी यामुळे हरभरा पिके पूर्णतः सुकत आहे. दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे.
- नितीन देशमुख, शेतकरी, एकलारा बानोदा
काकनवाडा शिवारात माझे शेत असून हरभरा या पिकावर मर रोगाचे प्रमाण जास्त प्रमाणात असल्यामुळे हरभरा पिक सुकत आहे. त्यामुळे हरभरा पिकात रोटावेटर फिरविले आहे. शेतकरी वर्ग चांगलाच अडचणीत सापडला आहे. कृषी विभाग व शासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
- अमोल रावणकार, शेतकरी, काकनवाडा बुद्रुक
माझ्या शेतात हरभरा या पिकाची लागवड केली होती. अवकाळी पाऊस व पिकांवर झालेला प्रादुर्भाव अळीचे प्रमाण बुरशीजन्य रोग यांनी थैमान घातले आहे. त्यामुळे हरभरा मोडण्याची वेळ आली असून दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. शासनाकडून मदत देण्यात यावी तसेच कृषी विभागाकडून मार्गदर्शनाची गरज आहे.
- राहुल मनसुटे, शेतकरी, बावनबीर