बैलांच्या शृंगाराला महागाईचा साज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:41 AM2021-09-04T04:41:29+5:302021-09-04T04:41:29+5:30
बुलडाणा : यंदाही बैलपोळ्यावर कोरोनाचे सावट असल्याने बैलांचा साज विक्री करणाऱ्या दुकानांची संख्या निम्म्याने घटली आहे. गतवर्षी सर्व साज ...
बुलडाणा : यंदाही बैलपोळ्यावर कोरोनाचे सावट असल्याने बैलांचा साज विक्री करणाऱ्या दुकानांची संख्या निम्म्याने घटली आहे. गतवर्षी सर्व साज विक्री न झाल्याने अनेकांनी तो बाजारात पुन्हा विक्रीसाठी ठेवला आहे. बैलांच्या शृंगाराला महागाईचा साज असल्याने शेतकऱ्यांचा पोळ्याचा खर्च वाढला आहे.
सोमवार, ६ सप्टेंबर रोजी पोळा सण आहे. पोळ्याला आपला बैल सर्व बैलांमध्ये उठून दिसावा, यासाठी शेतकरी बैलांना चांगले सजवतात. बैल सजविण्याकरीता साज शृंगार खरेदी करण्यात येतो. गळ्यात हार, डोक्याला बाशिंग, पायात चांदीचे व करदोड्याचे तोडे, नवी वेसण, नवे कासरे घातले जातात. त्याकरिता अनेक शेतकरी दरवर्षी नवे साहित्य खरेदी करतात. परंतु सध्या साहित्याचे वाढलेले दर पाहता, शेतकऱ्यांचे बजेट वाढले आहे. साहित्याच्या दरामध्ये मागील वर्षीच्या तुलनेत यंदा वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
३० टक्क्याने वाढले दर
मागील वर्षीच्या तुलनेत ३० ते ४० टक्क्यांनी बैलांचा साज दरवाढ झाली आहे. मोजक्याच काही वस्तूंचे दर कायम असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. त्यामुळे हिंगोळ वगळता इतर साहित्य खरेदी करणे शेतकरी टाळत असल्याचे दिसून आले.
झुलीवरही दरवाढीची झालर
बैल सजविण्यासाठी झूल हा महत्त्वाचा साज आहे. मागील वर्षीच्या तुलनेत झुलीचे दर हे २०० ते २५० रुपयांनी वाढले आहेत. झुलीवरही दरवाढीची झालर दिसून येत आहे.
बैलपोळा सणाची परंपरा आजही गावामध्ये जपली जात आहे. कोरोना असला, तरी नियम पाळून पोळा साधेपणाने साजरा केला जातो. परंतु यंदा बैल सजविण्यासाठी लागणाऱ्या साहित्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.
सतीश देव्हडे, शेतकरी.
बैलपोळ्यासाठी लागणारा साज चांगलाच महागला आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांना वेगवेगळा साज खरेदी करणे अवघड आहे. परंतु त्यात बैलांच्या शिंगांना लावण्यासाठी रंग व इतर काही साहित्य हे दरवर्षी खरेदी करावेच लागते.
राजू देशमुख, शेतकरी.
दरवाढीचा विक्रीवर परिणाम
यंदा बैलांचा साज विक्रीवर दरवाढीचा परिणाम जाणवत आहे. तसेच दुकानांची संख्याही घटली आहे. परंतु जे शेतकरी दरवर्षी साहित्य खरेदी करतात, ते शेतकरी येतच आहेत.
सय्यद फारुक सैय्यद हाशम आतार, विक्रेता.