कच्च्या कैरीची आवक वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:23 AM2021-06-22T04:23:36+5:302021-06-22T04:23:36+5:30
ग्रामीण भागात व्यवहार सुरळीत बुलडाणा : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या काही दिवसांपासून व्यवसाय सुरू करण्यास निर्बंध होते. त्यामुळे अनेकांना आर्थिक ...
ग्रामीण भागात व्यवहार सुरळीत
बुलडाणा : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या काही दिवसांपासून व्यवसाय सुरू करण्यास निर्बंध होते. त्यामुळे अनेकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला; मात्र आता अनलॉकमुळे ग्रामीण भागातील व्यवहार सुरळीत सुरू झाले आहेत.
सक्रिय रुग्णांची संख्या ११०
बुलडाणा: जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या शंभराच्या जवळ आली आहे. सध्या ११० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पहिल्यांदाच सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाली आहे. मागील काही दिवसांपासून दैनंदिन बाधित रुग्णांची संख्या कमी झाल्याने सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या घसरली आहे.
ग्रामीण बससेवा बंदच
डोणगाव : लॉकडाऊनमध्ये सुट दिल्यानंतर जिल्ह्यांतर्गत बस सेवा सुरू करण्यात आली; मात्र ग्रामीण भागातील बससेवा अद्यापही पूर्णपणे सुरू झाली नाही. बससेवा सुरू होण्याची प्रवाशांना प्रतीक्षा आहे.
दुधाळ जनावरांना टॅग लावण्याची मागणी
बुलडाणा : पशुसंवर्धन विभागातर्फे दुधाळ जनावरांना टॅग लावण्याची मोहीम सुरू करण्यात आली होती; मात्र काही कारणास्तव ही मोहीम थंडावलेली आहे. गुरांना टॅग लावल्यास त्याची सविस्तर माहिती उपलब्ध होऊ शकणार आहे.
वाहतूक शाखेची कारवाई जोमात
बुलडाणा : अपघाताचे प्रमाण टाळण्यासाठी वाहनधारकांनी नियम पाळणे आवश्यक आहे. वाहनधारक नियम पाळतात की नाही, याची पडताळणी व कारवाई करण्याची प्रमुख जबाबदारी शहर वाहतूक शाखेकडे असून, सध्या वाहतूक शाखेची कारवाई जोमात सुरू आहे.
मजुरांना मिळेना काम
मेहकर: कोरोनाच्या संकटकाळात जास्तीत जास्त मजुरांना रोजगार देण्याच्या उद्देशाने जिल्ह्यात रोहयोची कामे वाढविण्यात आली आहेत; मात्र सध्या अत्यल्प मजुरांना काम मिळत आहे. उर्वरित मजुरांना मात्र कामासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.
सांडपाण्याच्या नाल्यातील झुडपे काढणार केव्हा?
बुलडाणा : शहराच्या विविध भागातून वाहणाऱ्या सांडपाण्याच्या नाल्या, घनकचरा अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिल्याने झाडझुडुपे, बेशरम वाढली आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांत सरपटणाऱ्या प्राण्यांचे प्रमाण वाढल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कपाशीला दमदार पावसाची प्रतीक्षा
किनगाव राजा : परिसरातील शेतकऱ्यांची बागायती कपाशीची लागवडीसाठी लगबग सुरू झाली आहे. यामुळे बियाणे विक्रेत्यांच्या दुकानासमोर शेतकऱ्यांची गर्दी दिसून येत आहे. ज्या शेतकऱ्यांनी मागील आठवड्यातच कपाशीची लागवड केली, त्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
वातावरणातील बदलाने आजाराची भीती
बुलडाणा: अचानक होत असलेल्या वातावरणातील बदलांमुळे नागरिकांना सर्दी, ताप, उल्टी, खोकला, डोकेदुखी, डोळे जळजळ करणे, या आजारांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये सध्या भीती निर्माण झाली आहे.
बुलडाणा तालुक्यात चार कोरोना पॉझिटिव्ह
बुलडाणा : तालुक्यात चार कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सोमवारी आढळून आले आहेत. कोरोनाबाधितांचे प्रमाण आता कमी झाले आहे. तरीसुद्धा प्रत्येकाने नियमांचे पालन करावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.