अल्पसंख्यांक, दिव्यांग शाळांमध्ये पायाभूत सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2020 02:38 PM2020-01-25T14:38:06+5:302020-01-25T14:38:13+5:30
पायाभूत सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी वार्षिक दोन लाख रुपये एवढ्या रकमेच्या मर्यादेपर्यंत अनुदान शासनाकडून उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थीबहुल खाजगी शाळा व दिव्यांग शाळांमध्ये पायाभूत सुविधांसाठी अनुदान देण्यात येत आहे. या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी शाळांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. प्रस्ताव सादर करण्यासाठी ५ फेब्रुवारीची डेडलाईन देण्यात आली आहे.
धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थीबहुल शासनमान्य खाजगी अनुदानीत, विनाअनुदानीत, कायम विनाअनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगर परिषद शाळा व दिव्यांग शाळांमध्ये पायाभूत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना राबविण्यात येते. त्यासाठी शाळांकडून ३० नोव्हंबर पर्यंत प्रस्ताव मागविण्यात आले होते. शाळांनी आवश्यक कागदपत्रे जोडून प्रस्ताव सादर करण्यास आता मुदतवाढ देण्यात आली आहेत. अंतिम मुदत ५ फेब्रुवारी आहे. इच्छुक शाळांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन संबंधीत विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. इच्छुक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांनी संपूर्ण भरलेला अर्ज अल्पसंख्यांक विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा येथे ५ फेब्रुवारी पर्यंत सादर करणे आवश्यक आहे. अंतिम मुदतीची प्रतिक्षा न करता इच्छूकांनी तात्काळ अर्ज सादर करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे. धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल असलेल्या शासनमान्य शैक्षणिक संस्थांना पायाभूत सोयी- सुविधा उपलब्ध करुन देवून शिक्षणाचा गुणात्मक दर्जा उंचावण्यात येणार आहे. त्यासाठी पात्र शासनमान्य खासगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांना पायाभूत सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी वार्षिक दोन लाख रुपये एवढ्या रकमेच्या मर्यादेपर्यंत अनुदान शासनाकडून उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
या होणार सुविधा
या योजनेंतर्गत अनुदान देय असलेल्या पायाभूत सोयीसुविधा अशा शाळेच्या इमारतीचे नूतनीकरण व डागडुजी, शुध्द पेयजलाची व्यवस्था करणे, ग्रंथालय अद्ययावत करणे, प्रयोगशाळा, संगणक कक्ष उभारणे, अद्ययावत करणे, प्रसाधनगृह, स्वच्छतागृह उभारणे, डागडुजी करणे, विद्यार्थ्यांसाठी आवश्यक फर्निचर, इन्व्हर्टर, जनरेटरची सुविधा निर्माण करणे, झेरॉक्स मशीन, अध्ययनाची साधने, एलसीडी प्रोजेक्टर, अध्ययनासाठी आवश्यक विविध सॉफ्टवेअर, इंग्रजी लँग्वेज लॅब, संगणक हार्डवेअर आदी सुविधांसाठी या अनुदान योजनेचा लाभ दिला जाणार आहे.