आरटीईच्या प्रक्रियेत सुरूवातीलाच विघ्न!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 05:46 PM2019-02-23T17:46:12+5:302019-02-23T17:46:22+5:30
बुलडाणा: जिल्ह्यातील २३० शाळांमध्ये आगामी शैक्षणिक सत्रासाठी आरटीई अंतर्गत २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. मात्र आरटीई प्रक्रियेच्या सुरूवातीलाच विघ्न निर्माण झाल्याने आता प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकातही बदल झाला आहे.
- ब्रम्हानंद जाधव
बुलडाणा: जिल्ह्यातील २३० शाळांमध्ये आगामी शैक्षणिक सत्रासाठी आरटीई अंतर्गत २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. मात्र आरटीई प्रक्रियेच्या सुरूवातीलाच विघ्न निर्माण झाल्याने आता प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकातही बदल झाला आहे. शाळांच्या नोंदणीसाठी ८ ते २२ फेब्रुवारी हा कालावधी ठेवण्यात आला होता. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे ही प्रक्रिया पुढे ढकलली असून शाळांच्या नोंदणीकरीता आता २८ फेब्रुवारीपर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे.
समाजातील दुर्बल व वंचीत घटकांतर्गत येणाºया बालकांसाठी मोफत शिक्षण मिळावे, यासाठी आरटीईची २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. २५ टक्के मोफत प्रवेशामध्ये सर्व माध्यमाच्या, सर्व बोर्डाच्या (राज्यमंडळ, सीबीएसई, आयसीएसई व आयबीसह) विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित स्वयं अर्थसहाय्यित प्राथमिक सर्व शाळा जेथे वर्ग पहिली किंवा पूर्व प्राथमिक स्तरावरील आहेत, अशा प्रकारच्या शाळा या प्रवेशासाठी पात्र आहेत. शैक्षणिक सत्र २०१९-२० मध्ये २५ टक्के मोफत प्रवेशासाठी जिल्ह्यातील २३० शाळा पात्र ठरविण्यात आलेल्या आहेत. दरम्यान, ८ फेब्रुवारीपासून प्रवेश प्रक्रिया आॅनलाइन राबविण्यास सुरूवात झाली आहे. आरटीई प्रवेशपात्र शाळांची नोंदणी करण्यासाठी ८ ते २२ फेब्रुवारी असा कालावधी देण्यात आला होता. तर पालकांना आॅनलाइन अर्ज भरण्यासाठी २५ फेब्रुवारी ते ११ मार्च आणि पहिली सोडत काढण्यासाठी १४ ते १५ मार्च असे वेळापत्रक शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आले होते. मात्र या प्रवेश प्रक्रियेच्या सुरूवातीला तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेच्या या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आला आहे. दिलेल्या मुदतीमध्ये आरटीई प्रवेश पात्र शाळांना आॅनलाइन नोंदणी करता न आल्याने आता शाळांच्या नोंदणीसाठी २८ फेब्रुवारीपर्यंतची मुदत ठेवण्यात आली आहे. परिणामी, पालकांना करावयाचे अर्ज, आॅनलाई सोडत ही सर्व प्रक्रिया पुढे ढकलली आहे.
अर्जासाठी ५ मार्चचा मुहूर्त !
आरटीईच्या २५ टक्के मोफत प्रवेशांतर्गत पालकांना अर्ज भरण्यासाठी २५ फेब्रुवारीपासून सुरूवात होणार होती. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे ही प्रक्रिया लांबल्याने पालकांच्या अर्जासाठी आता ५ मार्चचा मुहूर्त शिक्षण विभागाला मिळाला आहे. पालकांना आॅनलाइन अर्ज भरण्याची मुदत ५ मार्च ते २३ मार्चपर्यंत राहणार आहे.
नव्या वेळापत्रकाची प्रतीक्षा
आरटईच्या प्रवेश प्रक्रियेची पालकांना सुरूवातीपासून उत्सुकता लागली होती. दरम्यान, ८ फेब्रुवारीला प्रवेश प्रक्रिया आॅनलाइन सुरू झाली; मात्र त्यात काही व्यत्यय निर्माण झाल्याने संपुर्ण प्रक्रियेचे वेळापत्रक बदलले आहे. या नव्या वेळापत्रकाची जिल्हा परिषदच्या शिक्षण विभागालाही प्रतीक्षा लागली आहे.
आरटीईची प्रवेश प्रक्रिया ८ फेब्रुवारीपासून आॅनलाइन सुरू झाली आहे. आरटीई प्रवेश पात्र शाळांच्या नोंदणीसाठी २२ फेब्रुवारी अंतीम मुदत होती. परंतू काही तांत्रिक अडचणींमुळे यात थोडाफार बदल झालेला आहे. आता २८ फेब्रुवारी ही नोंदणीसाठी अंतीम मुदत आहे.
- एस. टी. वºहाडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी, बुलडाणा.