वीज वाहिनीचा शॉक लागून मजूर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 05:04 AM2021-02-18T05:04:52+5:302021-02-18T05:04:52+5:30
दुसरबीड येथील ११ केव्हीची वीज वाहिनी गेल्या दोन दिवसांपासून तांत्रिक अडचणींमुळे बंद आहे. त्यामुळे परिसरातील कृषी पंपाचाही वीज पुरवठा ...
दुसरबीड येथील ११ केव्हीची वीज वाहिनी गेल्या दोन दिवसांपासून तांत्रिक अडचणींमुळे बंद आहे. त्यामुळे परिसरातील कृषी पंपाचाही वीज पुरवठा बंद होता. दरम्यान, वीज वाहिनीची पाहणी करण्यासाठी कंत्राटी स्तरावर मदतनीस म्हणून घेतलेला एक मजूर या वीज वाहिनीवर चढला होता. याच दरम्यान त्यास विजेचा शॉक लागून तो खाली पडल्याने जखमी झाला. याप्रकरणी अगोदर वीज वाहिनी पूर्णपणे बंद आहे का? याची खातरजमा करणे आवश्यक होते. त्याबाबत महावितरणचे अभियंता गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता, ते उपलब्ध होऊ शकले नाही. त्यामुळे सिंदखेड राजा येथील कार्यालयात याबाबत तेथील खान नामक अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी संबंधित मदतनीस मजूर हा कंत्राटी स्तरावर घेतला असून, त्यास खांबावर चढण्याचा अधिकार असल्याचे त्यांनी सांगत अधिक माहिती देण्याचे टाळले. प्रकरणी योग्य चौकशी व्हावी, अशी मागणी होत आहे. शॉक लागून झालेल्या जखमीस प्रथमोपचार करून जालना येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे.