इन्कलाब जिंदाबाद... वंदे मातरम्...।
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 04:16 AM2021-01-24T04:16:53+5:302021-01-24T04:16:53+5:30
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कारकीर्दीवर महानायक या कादंबरीसह ‘पानिपत’, ‘संभाजी’ यासारख्या १५ कादंबऱ्या लिहिणारे, अनेक पुरस्कारप्राप्त आणि मानाच्या साहित्य ...
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कारकीर्दीवर महानायक या कादंबरीसह ‘पानिपत’, ‘संभाजी’ यासारख्या १५ कादंबऱ्या लिहिणारे, अनेक पुरस्कारप्राप्त आणि मानाच्या साहित्य अकादमी पुरस्काराचे मानकरी ठरलेले विश्वास पाटील यांनी संमेलनाचे अध्यक्षस्थान भूषविले. यावेळी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, महिला व बालकल्याणमंत्री यशोमती ठाकूर, स्वागताध्यक्ष बुलडाणा अर्बनचे कार्यकारी संचालक डॉ. सुकेश झंवर, ‘बारोमास’कार प्रा. सदानंद देशमुख, जयश्री शेळके, विजय अंभोरे, जयसिंगराजे देशमुख, सुरेश साबळे उपस्थित होते. उद्घाटन समारंभात दीपप्रज्वलन केल्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस, दिवंगत भगवान ठग व ताराबाई शिंदे यांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण करून मान्यवरांनी अभिवादन केले. यावेळी स्वागतसत्रही पार पडले. विश्वास पाटील यांनी नेताजींच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. जपानच्या त्या सैनिकांना आठवणीबद्दल विचारले असताना नेताजींनी सोन्याचा कुंभ उगवला, त्याची किरणे आम्ही मनात साठवली आहेत, असे त्यांनी सांगितले. जपानमध्ये फिरताना पुरुष येथे आहेत की नाही असे वाटते, एवढ्या प्रचंड प्रमाणात महिला अग्रभागी आहेत. नेताजी तेथे असताना एकही महिला घराबाहेर पडत नव्हती. महिलांना प्रोत्साहित करून त्यांनी एवढे परिवर्तन घडवून आणले की, आज महिलाच कारभारी आहेत. सिंगापूरमध्येही त्यांनी क्रांती घडविली. महिलांच्या हाती बंदूक देणारे नेताजी पहिले, क्रांतिकारी आहेत. नेताजींचे क्रांतिकारी विचार आजच्या युवकांनी आत्मसात केले पाहिजे. प्रास्ताविकात मुख्य संयोजक सतीशचंद्र रोठे यांनी संमेलनामागील भूमिका विशद केली. सुभाषबाबू हे देशाचे आयडॉल आहेत. मात्र, ते जनमनावर रुजवले, बिंबवले गेले नाहीत. आपल्या देशात सहकार्य मिळाले नाही, म्हणूनच त्यांनी विदेशात आपली फौज उभारली. त्यात महिलांना स्थान दिले. झाशी राणी ब्रिगेड स्थापन करून लक्ष्मी सहगल यांना प्रमुख बनवले. यावेळी अनघा भनजी मंडळाने स्वागतगीत व शिवरायांच्या पराक्रमाचा पोवाडा सादर केला. संचालन रणजितसिंह राजपूत यांनी केले.
साहित्यिकांनी शेतकऱ्यांच्या मनाचा कानोसा घ्यावा : पाटील
साहित्य संमेलनानिमित्त साहित्यिक, लेखकांनी जीवन टिपावे, वाचकांच्या हृदयाचा ठाव घ्यावा. शेतकऱ्यांच्या मनाचा कानोसा घ्यावा म्हणजेच अस्सल, कसदार लिखाण करता येईल, अशी अपेक्षा कादंबरीकार विश्वास पाटील यांनी व्यक्त केली.