बुलडाणा जिल्ह्यात पिकांवर आता किडीचे संकट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 11:47 AM2021-07-11T11:47:16+5:302021-07-11T11:47:39+5:30
Insect crisis on crops in Buldana district now : रिमझीम पाऊस व ढगाळ वातावरणामुळे पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे.
- ब्रह्मानंद जाधव
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली होती. दरम्यान, दोन दिवसांपासून पावसाच्या हजेरीने पिकांना संजीवनी मिळाली आहे. परंतु काही भागात रिमझीम पाऊस व ढगाळ वातावरणामुळे पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे. सोयाबीनवरही ‘गर्डल बिटल’चा प्रादुर्भाव झाला असून, सोयाबीनच्या झाडाचे शेंडेच गायब होत असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात मृग नक्षत्रात झालेल्या चांगल्या पावसावर जवळपास ६० टक्के पेरणी पूर्ण झाली होती. परंतु त्यानंतर पाऊस नसल्याने ही पीके अडचणीत सापडली होती. दोन दिवसापासून झालेल्या पावसामुळे या पिकांना आता संजिवनी मिळाली आहे.
आता ६४ टक्के पेरणी झालेली आहे. त्यामध्ये सर्वाधिक सोयाबीन पीक आहे. सध्या वातावरणातील बदलाने पिकांना कडीचा फटका बसत आहे. सोयाबीन पिकांमध्ये खोड पोखरणाऱ्या किडींमध्ये प्रामुख्याने खोडमाशी आणि चक्रभुंगाचा प्रादुर्भाव अधिक आहे.
इतर किडींच्या तुलनेत या दोन किडींचा प्रादुर्भाव सोयाबीनवर मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. चक्र भुंग्याच्या प्रादुर्भावामुळे सुमारे ३५ टक्क्यापर्यंत, तर खोडमाशी मुळे ६० ते ७० टक्क्यापर्यंत नुकसान होऊ शकते. त्यामुळे या किडींचे वेळीच योग्य नियोजन करण्यासाठी शेतकरी वेगवेळ्या औषधांची फवारणी करत आहेत. सोयाबीन शिवाय मूग, उडीद, चवळी, तूर, भुईमूग, मिरची, कारली या पिकावरही ‘गर्डल बिटल’चा प्रादुर्भाव होत आहे.
या किडीच्या प्रादुर्भावाने शेतकऱ्यांची चिंता वाढविली आहे.
या दिवसात खोडमाशी, खोडकीड, ‘गर्डल बिटल’चा प्रादुर्भाव सोयाबीन पिकावर जाणवतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. थायामेथोक्झाम आणि लॅम्बडा सायहॅलोथ्रिन एकत्र चार मिली १० लिटर पाण्यात एका पंपाला देणे आवश्यक आहे.
- डॉ. सी. पी. जायभाये,
कृषी शास्त्रज्ञ.