नादुरुस्त कालव्यात ताडपत्री टाकून पाझर तलावात पाणी सोडण्याचा अट्टाहास!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:30 AM2021-02-15T04:30:51+5:302021-02-15T04:30:51+5:30
पाणी मागणी अर्ज भरलेले नसताना उजव्या कॅनॉलवरून पाणी देण्याच्या स्थितीत नसताना संबंधित विभाग यांनी अजब फंडा वापरत चक्क ...
पाणी मागणी अर्ज भरलेले नसताना उजव्या कॅनॉलवरून पाणी देण्याच्या स्थितीत नसताना संबंधित विभाग यांनी अजब फंडा वापरत चक्क ताडपत्री पसरून पाणी सोडण्यात आले आहे. ताडपत्री कोणत्या निधीतून उपलब्ध केली आहे, हा या ठिकाणी चर्चेचा विषय बनला आहे. धरण १०० टक्के भरले असून गेले सहा वर्षानंतर जवळपास प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर कालव्याची दुरवस्था झालेली आहे. या कालव्यातून शेतीसाठी शेतकऱ्यांना पाणी मिळावे, परंतु कालव्याची दयनीय अवस्था असताना सिंचन विभागाकडून कालव्याचे पाणी पाडळी शिंदे येथील पाझर तलावात सोडण्यात येत आहे. सद्यस्थितीत उन्हाळ्याची दाहकता वाढत असताना शिवणी आरमाळ प्रकल्पावरून अंढेरा, नागनगाव, सुरा, पाडळी शिंदे, शिवनी आरमाळ आधी गावांच्या पाणीपुरवठा योजना असताना नादुरुस्त कॅनॉलमधून पाणी सोडणे संबंधित विभागाला तर गरजेचे वाटते. संबंधित विभागाला धरणाच्या भिंतीपेक्षा देखभाल दुरुस्तीचा पैसा कालव्यातील ताडपत्री वर खर्च करायचा यातून संबंध विभागाचा निष्काळजीपणा आणि कालव्या प्रती उदासीनता दिसून येत असल्याचा आरोप डिग्रस सर्कलचे शिवसेना विभाग प्रमुख स्वप्निल शिंदे यांनी केला.
--नंतर अर्ज भरून घेऊ--
पाणी मागणी अर्ज किती आले? याबाबत विचारणा केली असता अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत आहेत. अगोदर पाणी सोडण्यात आल्यानंतर दप्तर कारकून नसल्याने नंतर अर्ज भरून घेऊ, अशी माहिती प्रभारी अभियंता रोशन गंगावणे यांनी दिली.